कागल(विक्रांत कोरे): कागल शहरानजिक महामार्गावर जाधव मळ्याकडे जाणारा बोगदा आहे. गेल्या दोन दिवसात भरपूर पाऊस पडला आहे. हा बोगदा पाण्याने तुडुंब भरला आहे. त्यामुळे बोगदा फुल्ल अन् रस्ता गुल्ल अशी अवस्था झाली आहे. राज्य महामार्गावर कागल शहराच्या पश्चिमेस दलित वसाहतीजवळ लोकांना ये -जा करण्यासाठी बोगदा ठेवण्यात आला आहे.
महामार्गाच्या पश्चिमेस जाधव मळा, आरटीओ तपासणी नका, आंबील कट्टी वसाहती व कार्यालये आहेत. परंतु पाण्याने तुडुंब भरलेल्या बोगद्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने ही दैनिय अवस्था झाली आहे. चार चाकी वाहने या पाण्यातून घालण्यासाठी चालक भयभीत होत आहेत.
जाधव मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला पाईप टाकून पाणी नदीकडे जाण्याच्या दिशेला गटार बसविण्यात आल्याचे समजते. परंतु तेथील एका व्यवसायिकाने मुरूम ओतून सदरची गटार ब्लॉक केल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. ही गटार खुली केल्यास तुंबलेल्या पाण्याला दिशा मिळेल. गुल्ल झालेला रस्ता खुला होईल अशी नागरिकांतून चर्चा होत आहे. तेव्हा झोपलेले रस्ते विकास महामंडळ जागे होणार का ॽ असा सवाल नागरिकातून केला जात आहे.