कागल(कॄष्णात कोरे) : पूणा – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी सर्कल येथे चालू स्थितीतील ट्रकला पाठीमागून अचानक आग लागली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून तो ट्रक सेवा रस्त्यावर घेतला आणि त्याने ट्रकमधून उडी मारली. ट्रकमध्ये असलेले नायलॉन धागा ऑटो बीम जळून खाक झाले. यामध्ये ट्रकही बेचिराख झाला. या आगीत लाखोंचे नुकसान झाले.
ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुजरात मध्ये एका खाजगी कंपनीत ट्रक क्रमांक जी.जे. 16 ए. यू. 1883 या मधून नायलॉन धाग्याचे मोठ्या आकाराचे सहा बीम भरले. गुजरात मधून शनिवारी सकाळी दहा वाजता ट्रक निघाला पूना बेंगलोर महामार्गावरून तो म्हैसूर कडे जात होता. दरम्यान महाराष्ट्र हद्द संपली कर्नाटक हद्दीत प्रवेश केला दूधगंगा नदी पासून काही अंतरावर गेल्यानंतर ट्रक मध्ये पाठी मागील बाजूने आग लागली.
एका हॉटेलच्या दारात असलेल्या गॅरेज चे मालक पंकज घाटगे राहणार करनूर याने जोराने आरडाओरड केली. आपल्या ट्रक मध्ये पाठीमागे आग लागल्याची चालकाच्या लक्षात आले, त्याने प्रसंगावधान राखून ट्रक राष्ट्रीय महामार्गावरून सेवा रस्त्यावर घेतला. त्या ठिकाणी ट्रक सोडून त्याने उडी मारली आणि तो बचावला. बघता-बघता आगीचे लोट आकाशात झेप घेऊ लागले. ट्रकला आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सदरची बातमी समजताच कर्नाटक व महाराष्ट्रातील पोलीसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी कर्नाटकाकडे जाणारा महामार्ग रोखला त्यामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली. कागल नगरपालिकेचे अग्निशामक बंड घटनास्थळी तात्काळ आले. कागल नगरपालिकेचे कर्मचारी पांडुरंग कुसळ, शामराव पाटील, नितेश कांबळे, निलेश पिसाळ, पिंटू कांबळे यांनी आग आटोक्यात आणली. आग विझल्यानंतर कर्नाटकचा अग्निशामक बंब दाखल झाला. या ट्रकच्या आगीत ट्रक चालक आसिफ खान मोहम्मद खान पठाण हा सुदैवाने बचावला. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.