कोल्हापूर : महसूल विभागाचा खुप जूना इतिहास आहे. दिवसेंदिवस महसूल विभागाची रचना बदलत चालली आहे. महसूल विभागाचे महत्व ठिकवून ठेवले पाहिजे. सर्व क्षेत्रात काम करणारा महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन कार्यक्रम पार पडला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, भूसंपादन अधिकारी शक्ती कदम, भूसंपादन अधिकारी विवेक काळे, सनदी लेखापाल भाऊसो नाईक, कलाकार नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.