‘शाहू’च्या ४७व्या गळीत हंगामाचा मोळी पूजन समारंभ विधिवत संपन्न
कागल (प्रतिनिधी) : व्यवस्थापनाने निश्चित केलेले ऊस गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळितासाठी पाठवून सहकार्य करावे,असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४७व्या गळीत हंगामाच्या मोळी पूजन समारंभात ते बोलत होते.

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,‘‘पूर्वी साखर कारखाने १८० दिवसांपर्यंत सुरू असायचे.आता सरासरी गळीत हंगाम १०० दिवसांवर आला आहे. त्यामुळे कमी दिवसांत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे आव्हान कारखान्यांसमोर आहे. यावर्षी एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगाम आव्हानात्मक आहे. मात्र, इतर भागांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकाची परिस्थिती चांगली आहे.’’
साखरेच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शासनाने इथेनॉल निर्मितीवर कोणतीही बंधने आणू नयेत.इथेनॉलला योग्य दर मिळणे आवश्यक असून, तरच इथेनॉल प्रकल्प आर्थिकदृष्ट्या टिकू शकतील. इथेनॉल निर्मितीवर बंधने आणल्यास त्याचा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो, असा यापूर्वीचा अनुभव आहे. अशा परिस्थितीत इथेनॉल प्रकल्पधारकांना प्रकल्प बंद ठेवावा लागल्यामुळे त्यांच्या होणा-या नुकसानीची भरपाई मिळावी,अशी केंद्र सरकारकडे त्यांनी आग्रही मागणी केली.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हक्काचा ऊस उपलब्ध व्हावा, यासाठी कारखान्यामार्फत ऊस उत्पादनवाढीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शेतकऱ्यांनी या उपक्रमांचा लाभ घेऊन ऊस उत्पादन वाढवावे.जिल्ह्यासह शेजारील साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरू करण्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ‘शाहू’चा गळीत हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल,असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.
संभाव्य अडचणींतून मार्ग काढण्यासाठी पर्याय नियोजन
सहकारी साखर कारखानदारी सध्या विविध अडचणींतून मार्गक्रमण करीत आहे. शेतकरी संघटना आणि कारखानदार साखर उद्योगासमोरील विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.अशा आव्हानात्मक परिस्थितीतही स्वर्गीय राजेसाहेबांपासून ‘शाहू’ने संकटांचा अंदाज घेऊन पूर्वतयारी करण्याची परंपरा जपली आहे.त्याच धर्तीवर आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून त्याबाबतचे पर्यायी नियोजन कारखान्याने केले आहे, असे घाटगे यांनी सांगितले.
यावेळी गव्हाणपूजा ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.आशाराणी पाटील यांच्या हस्ते,सत्यनारायण पूजा संचालक युवराज पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते,तर काटापूजन संचालक सतीश पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंगल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व संचालक-संचालिका, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, सभासद,तोडणी-वाहतूक कंत्राटदार, अधिकारी,कर्मचारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले. संचालक सुनील मगदूम यांनी आभार मानले.