कागलमध्ये मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा
कागल (प्रतिनिधी) : ज्ञानदानातून चांगली पिढी आणि सुसंस्कृत समाज घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाहीत, तर त्यांच्या विचारांना आकार देऊन समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. हे कार्य शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत, याचा मनापासून आनंद आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागलमध्ये आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षक नेते दादासाहेब लाड, शिक्षक नेते भरत रसाळे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, नगराध्यक्षा सविता माने, आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. गाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाची चळवळ ही लोकचळवळ केली. सर्व धर्मांतील विद्यार्थी एकत्र शिकले, तर त्यांच्यातील जातिभेदाची भावना कमी होऊन ते माणूस म्हणून एकत्र येतील, असा व्यापक विचार शाहू महाराजांनी मांडला. त्यांच्या या विचारांची आजही समाजाला नितांत गरज आहे.
समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्याची संधी आज मिळत आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा सन्मान करताना मनापासून आनंद होत आहे. शिक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यापासून शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करण्याची संधी परमेश्वराने शिक्षकांना दिली आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व मोठे आहे.
या पुरस्कारामुळे सन्मानित शिक्षकांना आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल, तसेच इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळून ते विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या मनात लोकप्रिय असलेला आणि त्यांच्या जीवनाला दिशा देणारा शिक्षक कसा असावा, याचा आदर्श आपल्या कार्यातून निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भैय्या माने हे फार वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनात भैय्या माने आमदार म्हणून शपथ घेतील, असा मला विश्वास आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले, सुरुवातीपासून मंत्री हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व मानतो. शिक्षकांचे प्रश्न घेऊन आम्ही जेव्हा-जेव्हा त्यांच्याकडे गेलो, त्यावेळी त्यांनी शिक्षकांना न्याय मिळवून दिला. आगामी काळात भैय्या माने यांना पदवीधर मतदारसंघातून आमदार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत .
जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राथमिक शाळांना उर्जितावस्था मिळवून दिली. शाळांच्या कंपाउंडसाठी निधी उपलब्ध करून दिला. शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. खेडोपाड्यातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ग्रामीण भागातील मुले जागतिक स्पर्धेत टिकली पाहिजेत, ही त्यांची भावना आहे.
यावेळी उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील व शिक्षक नेते भरत रसाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत शंकर संकपाळ यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले.सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार सुकुमार पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ .सविता माने, आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. गाडे, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, सुकुमार पाटील, व्ही. जी. पोवार, नंदकुमार कांबळे, रफिक पटेल, एकनाथ देशमुख, बळवंत माने, पी. बी. घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील आदी उपस्थित होते.
हीच तर कामाची पोहोचपावती . . .
मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिव्यांगांना 25 इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप केले. या सायकलीवर बसणेही काही दिव्यांगांसाठी कठीण होते. मात्र सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहायला मिळाला. दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हा आनंदच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाची खरी पोहोचपावती आहे, असे जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी सांगितले.