मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित सदाशिवराव मंडलिक इंन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजमधील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना रुग्णसेवेची शपथ व लँप लायर्टीग कार्यक्रम प्राचार्या प्रोफेसर सुशीला लांबा व ट्रेनिंग कॉलेज सीपीआर कोल्हापूरच्या प्राचार्या डॉ. सरिता कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे तर कार्यवाह आण्णासो थोरवत, मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार प्रा. संभाजी आंगज प्रमुख उपस्थित होते.
प्राचार्या प्रोफेसर सुशीला लांबा यांनी उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. ट्रेनिंग कौलेज सीपीआर कोल्हापूरच्या प्राचार्या डॉ. सरिता कदम म्हणाल्या, विद्यार्थ्यांना करिअर निवडताना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच नर्सिंग क्षेत्राला अधिक प्राधान्य द्यावे. नर्सिंगमुळे लोकसेवा आणि व्यावसायिक असा दूहेरी फायदा होत असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात गजाननराव गंगापुरे यांनी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी डोंगराळ व दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाची सोय होण्याच्या दृष्टीने केलेल्या योगदानाविषयी कृतज्ञ उदगार काढले.
स्वागत व प्रास्ताविकात समन्वयक सुनील मंडलिक यांनी नर्सिंग कॉलेजच्या उभारणीविषयीची माहिती दिली. मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. उदय शेटे, प्रा. पी. पी. पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. सुषमा चव्हाण आणि संकेत जान्हुरे यांनी केले. आभार प्रा. सोनाली कुकडे यांनी मानले.