मुरगूड ( शशी दरेकर ) :
निढोरी ता.कागल येथे सलग 38 वर्ष श्री रामजन्मोत्सव सप्ताह आयोजित केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी हा सप्ताह चैत्र शुक्ल 3.शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 ते चैत्र शुक्ल 10 गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 या कालावधीत संपन्न झाला.या सप्ताहामध्ये काकड आरती,ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ,प्रवचन,किर्तन व उपस्थितांसाठी अन्नदान असे स्वरूप होते.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच श्री राम नवमी दिवशी सकाळी 10 ते 12 यावेळेत गुरुवर्य ह.भ.प उद्धव जांभळे महाराजांनी राम जन्मोउत्सवाच्या किर्तनातुन कलियुगात रामराज्याचं असणारं महत्व स्पष्ट केले.तर सायंकाळी दिंडी सोहळा आयोजित केला होता.
प्रभु रामचंद्रांना भारतीय परंपरेमध्ये विष्णूच्या दहा अवतारापैकी सातवा अवतार मानला जातो.उच्च ध्येयवादी व मूल्यांचे पुरस्कर्ते असणार्या प्रभु रामचंद्रांनी लोककल्याणकारी राज्य चालविले व अखंड भारताच्या उभारणीची पायाभरणी केली म्हणूनच या दिंडी सोहळ्यातून प्रभुरामचंद्रांच्या तत्वनिष्ठ विचारधारेचा जयजयकार करत असल्याची भावना भाविक भक्तातुन व्यक्त होत होती.
या दिंडी सोहळ्यात पारंपारिक पेहरावामध्ये सहभागी झालेले ग्रामस्थ अभंगाच्या तालावर तल्लीन होवून नाचत होते.गळ्यात अडकवलेल्या टाळांच्या खणखणाटाने परीसर दणदणुन निघत होता.दिंडीतील धोतर,पांढरा शर्ट आणि गांधी टोपी घातलेले वारकरी,भगव्या पताकांची फडफड,पायांचा टपटप आवाज करत चालणारा अश्व,गळ्यातील टाळांचा खणखणाट,दिंडींला चाल देण्याचे काम करणारे चोपदार उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
अंधकारमय जीवनाला तेजोमय करण्याचा संदेश देणारी मेणबत्ती पेटवून,विझू न देता अखंडित घरापर्यंत घेवून जाणारा दीपोत्सव साजरा करण्यात आला.या दिवशी रात्री 11 ते 4 यावेळेत हरिजागर करण्यात आला.या संपूर्ण सप्ताहामध्ये रघुनाथ सावंत व शंकर कळमकर यांनी चोपदार म्हणून सेवा दिली.
रामनवमीच्या दुसर्या दिवशी सकाळी ठिक 9.00 वाजता ह.भ.प रामचंद्र जांभळे महाराजांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. त्यानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.हा संपूर्ण सप्ताह सोहळा गुरुवर्य ह.भ.प उद्धव जांभळे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न झाला.