मुरगूड ( शशी दरेकर ) : महात्मा फुले हे मानवतावादाचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.त्यांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक समता निर्माण करण्यासाठी खर्ची घातले.संविधानाने निरपेक्षतेच तत्वज्ञान स्वीकारले आहे. नविन शैक्षणिक धोरणाच्या तरतुदीमध्ये सर्व मुल्यांचा समावेश आहे पण धर्मनिरपेक्षता हे मुल्य वगळले आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमातुन गांधी,नेहरूंना वगळून अभ्यासाचे ओझे कमी करत असल्याचे कारण अभ्यासक्रम मंडळ देत आहे पण दुसर्या बाजूला धर्मांधचे ओझे वाढत आहे त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येऊन अनारोग्याचा गंभीर प्रश्न भारतासमोर उभा राहत आहे असं मत प्रा.डॉ भालबा विभुते यांनी केले.ते समाजवादी प्रबोधिनी आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखरचे संचालक प्रविणसिंह पाटील होते.
समाजवादी प्रबोधिनी शाखा-मुरगुड यांच्या वतीने कोरोनाचा अपवाद वगळता 34 वर्षे अखंडित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित केली जाते.हि व्याख्यानमाला डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करतात.या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.भालबा विभुते यांना निमंत्रित केले होते.त्यांनी ‘महात्मा फुलेंचे विचार व सद्यस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे स्वागत प्रबोधिनीचे सचिव बबन बारदेस्कर यांनी केले तर प्रास्ताविक दलितमित्र डी.डी.चौगले यांनी केले.
डॉ.विभुते पुढे म्हणाले, निरुपयोगी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्यावर लादून मानवी मनातील संघर्षाची बीजे क्षीण करण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न या व्यवस्थेकडुन होत आहे.त्यामुळे भारतीयांची वाटचाल मानसिक गुलामगिरीकडे होत आहे. त्यामुळे समाज निर्भय व जागृत करण्याची गरज आहे.
यावेळी अॅड.सुधीर सावर्डेकर, बी.एस.खामकर, दलितमित्र एस.आर.बाईत, जयवंत हावळ, समिर कटके, विकास सावंत, शंकर कांबळे, भिमराव कांबळे, राम पोवार, शाहु फर्नांडिस, विनायक हावळ इत्यादी मान्यवर व श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विकास सावंत यांनी केले तर आभार समिर कटके यांनी मानले.