यावर्षी श्री मरिआई देवी यात्रा दणकेबाज करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
कागल(विक्रांत कोरे) – कोरोणाच्या महामारीमुळे गेली तीन वर्षे झाले कागल तालुक्यातील करनूर येथील यात्रा झालेली नव्हती ,यावर्षी श्री मरिआई देवी यात्रा दणकेबाज करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत नेटके आणि भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार तारीख 19 एप्रिल ते गुरुवार तारीख 21 एप्रिल पर्यंत यात्रा कमिटीने केले आहे.
तारीख 19 रोजी यात्रेचा प्रमुख दिवस असल्याने सकाळी दहा वाजता श्री मरिआई देवीची पालखीतून भव्य मिरवणूक होणार आहे. या मिरवणुकीची सुरुवात उपसरपंच प्रवीण कांबळे यांच्या हस्ते होणार आहे .रात्री दहा वाजता शंकरराव व जाणू पंत यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे .तारीख 20 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. पैलवान शशिकांत बोंगर्डे (बानगे) विरुद्ध पैलवान श्रीमंत भोसले ( इंचलकरंजी ) यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे. कुस्ती चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजीत घाटगे हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळचे संचालक अमरीश घाडगे ,मंडलिक फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, उद्योजक रमेश लालवानी, सिनेअभिनेते देवेंद्र चौगुले, प्रगतशील शेतकरी मोहनराव जाधव, आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत .रात्री दहा वाजता ललकार ऑर्केस्ट्रा होणार आहे .तारीख 21 एप्रिल रोजी येथील जागृत देवस्थान गैबीपिरास गलेफ व पहाटे चार वाजता फटाक्यांची आकर्षक आतषबाजी होणार आहे.
यात्रेचे सर्व संयोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक शिरोळे मार्गदर्शक अरविंद चौगुले, कार्याध्यक्ष सरपंच सौ उल्फत शेख ,सेक्रेटरी विठ्ठल धनगर, उपाध्यक्ष शरद चव्हाण, निमंत्रक आप्पासो गाडेकर ,तंटामुक्त अध्यक्ष महंमद शेख, पोलीस पाटील सुरेश कांबळे, मार्गदर्शक कुमार पाटील संघटक शिवराज घोरपडे, निमंत्रक मानसिंग पाटील आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य यांनी केले आहे
यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक शिरोळे यात्रे विषयी माहिती देताना म्हणाले ,गेली तीन वर्षे झाली कोरोना महामारी असल्याने कोणताही सण ,उत्सव ,कार्यक्रम गावात केलेला नाही. चालू वर्षी गावचे जागृत दैवत मरिआई_ बिरदेव व गैबीपिरअसल्याने ही यात्रा भरगच व नेटकेपणाने करण्याची तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले.