कोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये लाभ मिळण्यासाठी इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज दि. 30 डिसेंबर अखेर सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे-
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गट हा पुरुष किंवा महिलांचा असावा. बचत गटांची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती व कृषी विभाग यांच्याकडे नोंदणी झाल्याबाबतचे बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र. स्वयंसहाय्यता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
बचत गटातील सदस्यांचे जातीचे दाखले असणे आवश्यक आहे. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतीलच असावेत. बचत गटातील सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र (तहसिलदार यांचे). बचत गटातील सदस्यांचे आधार कार्ड असावेत. स्वयं सहाय्यता बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे संयुक्त असावे व आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयं सहाय्यता बचत गटाचे ताळेबंद प्रमाणपत्र असावे.
बचत गटातील सभासदाचे रेशन कार्ड ( एकाच कुटुंबातील एकच सभासद असावा) उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत रुपये 3.50 लाख राहील. त्यामध्ये 90 टक्के म्हणजेच रुपये 3.15 लक्ष (तीन लाख पंधरा हजार रूपये फक्त) शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा 10 टक्के म्हणजेच रूपये 35 हजार इतका असेल.
मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार यावर्षीच्या लाभासाठी केला जाणार नाही. तसेच यापूर्वी म्हणजे सन 2021-22 मध्ये ज्या बचत गटांनी अर्ज सादर केले आहेत त्या पात्र लाभार्थी बचत गटांनी पुन्हा अर्ज सादर करु नये. अधिक माहिती करिता कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.