कारखान्याचा ४५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने “शाहू “चा नवीन उपक्रम
कागल( विक्रांत कोरे) : शेतकरी व सभासदांसाठी सीएनजी चलित ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व शेती मशागत तसेच ड्रोन द्वारे औषध फवारणीचा उपक्रम राबविणारा ” शाहू “साखर कारखाना देशातील पहिला कारखाना आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कारखान्याच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त सीएनजीचलित ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व शेती मशागतीचे प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी ते बोलत होते. शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सुरवातीस कारखान्याच्या प्रांगणातील छत्रपती शाहू महाराज,कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्याचे व कागलाधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेचे कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे यांनी पूजन करून अभिवादन केले.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे शेतकऱ्यांच्या हितासाठी वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच शाहू प्रगतीचे नवनवीन टप्पे पार करीत आहे. वाढत्या ऊस वाहतूक खर्चावर नियंत्रणासाठी सीएनजीच्या वापराचा पर्याय पुढे येत आहे.अशा ट्रॅक्टरना शाहू साखर कारखाना प्रोत्साहन देणार आहे. शिवाय राजे बँकेच्या माध्यमातून त्यासाठी अर्थसाह्यही वाहनधारकांना केले जाईल. अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आज प्रत्यक्षात सीएनजी ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व कारखाना फार्मवर नांगरटीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. श्री. घाटगे यांनी हा ट्रॅक्टर स्वतः चालवून उपस्थित शेतकऱ्यांसमवेत या नवीन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली.
यानिमित्ताने शिवजयंतीदिवशी पन्नास किलोमीटर अंतर शिवज्योत घेऊन धावलेल्या सागर शेळके व एकोंडीचे नुतन उपसरपंच अक्षय चौगुले यांचा सत्कार केला.
राजे बँकेच्या माध्यमातून मेक इन इंडियाच्या धर्तीवर राबविण्यात येत असलेल्या मेक इन कोल्हापूर या उपक्रमामध्ये सहभागी उद्योजकांचे उद्यमशील तरुणांना उपयुक्त ठरणारे स्टॉल कार्यक्रम स्थळी लावले होते .
गडहिंग्लज येथील मेंगाने गुळाचा चहाचे मालक निखिल मेंगाने यांना या उपक्रममध्ये सहभागाचे पत्र श्री. घाटगे यांच्या हस्ते प्रदान केले.
या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील,उपाध्यक्ष नंदकुमार माळकर,संचालक राजेंद्र जाधव,प्रकाश पाटील व सर्व संचालक, शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद शेतकरी,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राजे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण यांनी बँकेच्या विविध कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली.
स्वागत शेती अधिकारी रमेश गंगाई यांनी केले.आभार संचालक यशवंत माने यांनी केले.
फायदे सीएनजी ट्रॅक्टरचे
केवळ डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत सीएनजी चलित ट्रॅक्टर वापराने ऊस वाहतूक व मशागतीमध्ये खालील फायदे होत असल्याचे कॉंप बीडी प्लसचे संचालक शिरीष गानू यांनी नमूद केले .रोमॅटो टेक्नो सोल्युशन आणि टोमासेटा एकाईल इंडिया यांनी मिळून सीएनजी व डिझेलवर संयुक्तपणे चालणारे हे किट विकसित केले आहे. ते सद्या डिझेलवर सुरू असलेल्या ट्रॅक्टरला बसविता येते. त्यामुळे डिझेल खर्चामध्ये पंचावन्न टक्के बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो. प्रदूषण, देखभाल-दुरुस्ती खर्च कमी होतो, ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढते.