बातमी

मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारी ‘सारथी’

मराठा समाजातील विद्यार्थी व युवकांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) कार्यरत असून या संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात सुरु आहे. सारथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगा बरोबरच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थी यश मिळवत असून यामुळे शासकीय अधिकारी बनण्याचे त्यांचे स्वप्न साकार होत आहे.

सारथी संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील साळशी येथील आशिष अशोक पाटील व भुदरगड तालुक्यातील निळपण येथील आनंद अशोक पाटील या सारथीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवेमध्ये (आयएएस) निवड झाली असून ही बाब सारथीमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

स्पर्धा परीक्षांतील यश -महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभागांतर्गत विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सारथीमध्ये देण्यात येते. सारथी संस्थेच्यावतीने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मागील तीन वर्षात भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षेमध्ये 12 विद्यार्थी, आयपीएस परीक्षेत 18 विद्यार्थी, आयआरएस परीक्षेत 8 विद्यार्थी तसेच इतर केंद्रीय सेवांमधील विद्यार्थ्यांसह सारथीचे एकूण 51 विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. तसेच भारतीय वन सेवेसाठी 2 तर केंद्रीय सशस्त्र पोलीस सेवा (CAPF) सेवेसाठी 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठी जिल्ह्यातील 20 विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आले. यापैकी 9 विद्यार्थी केंद्रीय नागरी सेवेसाठी, 4 विद्यार्थी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी, 3 विद्यार्थी केंद्रीय वन सेवेसाठी तर 4 विद्यार्थी केंद्रीय अभियांत्रिकी सेवेसाठी अर्थसहाय्यासाठी पात्र ठरले.

स्पर्धा परीक्षांमध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांचे यश – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतर्गत महाराष्ट्र नागरी सेवेसाठी जिल्ह्यातील 376 विद्यार्थी, महाराष्ट्र कृषी सेवेसाठी 46, स्थापत्य अभियांत्रिकी सेवेमध्ये 28, वन सेवेमध्ये 12, यांत्रिकी सेवेमध्ये 16 व न्यायालयीन सेवेमध्ये 2 (सीजेजेडी जेएमएफसी) असे एकूण 504 विद्यार्थी अर्थसहाय्यासाठी पात्र ठरले. सारथी संस्थेमधून महाराष्ट्र नागरी सेवेचा अभ्यास करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांची राज्यसेवेच्या विविध पदांवर निवड झाली आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण- सारथी संस्थेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीनही ट्प्प्यांवर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षा विभाग सक्रिय रित्या कृतिशील असून याउपक्रमांतर्गत युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी राज्यभरातून 500 विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रुपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्कही सारथी मार्फत भरण्यात येते. मागील तीन वर्षात 1 हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 21 कोटी रुपयांचा निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य- युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये एकरकमी अर्थसहाय्य म्हणून दिले जाते. मागील तीन वर्षात एकूण 650 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3 कोटी 25 लाख रुपयांचा निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा मुलाखतीसाठी सहाय्य – मुलाखतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 25 हजार रुपये एक रकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाख निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आला आहे.

श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम – श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इंडो जर्मन टुल रुम मधून जिल्ह्यातील 104 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. इंडो-जर्मन टूल रूम (आयजीटीआर), औरंगाबाद ही संस्था भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्यम मंत्रालयांतर्गत काम करते. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद, पुणे, नागपूर व कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून 24 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ही संस्था पदव्युत्तर, पदव्युत्तर पदविका, पदविका स्तर आणि प्रमाणपत्र स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाच्या विस्तृत स्पेक्ट्रमच्या समावेशासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करते. त्यामध्ये टूल डिझायनिंग, कॅड, कॅम, सीएनसी मशिनिंग, एलसीएस तसेच टेलरमेड मोड्युल्सच्या विशिष्ट क्षेत्रातील अल्पकालीन अभ्यासक्रमांचे डिझाईन केले जाते. सारथीच्या लक्षित गटातील ग्रामीण तरुणांचे कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने सारथीचा या संस्थेसोबत करार झाला आहे. सारथीमार्फत हे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करुन दिले जाते. सन 2022-23 मध्ये 424 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यांच्या प्रशिक्षणासाठी 71 लाख 73 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- सारथी संस्थेचे उपकेंद्र कोल्हापूर मधील राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील पूर्व आयएएस प्रशिक्षण केंद्राच्या मागे सुरु आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे संकेतस्थळ-
https://sarthi-maharashtragov.in
यावर किंवा उपकेंद्राचा दूरध्वनी क्रमांक – 02312992723 यावर अधिक माहिती मिळेल.

सारथी संस्थेच्यावतीने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असून यामुळे या समाजातील विद्यार्थी व युवकांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या सक्षमीकरण होण्यास मदतच होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *