मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर आणि परिसरातील गावांमध्ये रंगपंचमी उत्साहात पार पडली. चौकाचौकांमध्ये डॉल्बीच्या ठेक्यावर उत्साही अबालवृद्धानी विविध रंगांची मुक्त उधळण करीत रंगपंचमी उत्सव साजरा केला. शहराच्या अनेक वसाहतींमध्ये देखील सकाळी बारापर्यंत उत्साह कायम होता. यावर्षी महिला आणि तरुणीनी यामध्ये आपला विशेष सहभाग दाखवत ‘रांधा, वाढा उष्टी काढा’ या धबाडक्यातून बाहेर येत रंगांची मुक्त उधळण केली. डॉल्बीच्या ठेक्यावर अनेकांनी तालही धरला.
दुपारच्या रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली आणि रंगात न्हाऊन निघालेले अनेकजण नदी-विहीरीकडे धाव घेऊन मनसोक्त स्नान करीत असल्यामुळे दुपारी उशिरापर्यंत नदीवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. शनिवार सुट्टीचा दिवस नसूनदेखील बहुतांश शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी दांडी मारली. सकाळच्या वेळेत बाजारपेठाही पूर्ण बंद होत्या.