सभेत कारखानदाराशी झालेल्या चर्चेचे पडसाद उमटण्याची शक्यता
मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची सभा मुरगुड ता. कागल येथे गुरुवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वा हुतात्मा तुकाराम चौक येथे होणार आहे.ऊस दराचे आंदोलन सध्या पेटलेले असून गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींबाबत भाष्य करण्यासाठी आणि लोकभूमिका तयार करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती मुरगुड शेतकरी संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली.
मागील वर्षीच्या उसासाठी वाढीव चारशे रुपये हप्ता आणि चालू गळीतासाठी हंगामातील प्रतीटन 3500 रू.ची मागणी याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी ठाम आहेत . गेल्या काही दिवसापासून साखर कारखानदारांशी झालेल्या चर्चेचे पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता आहे.
राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या कागल तालुक्यात मुरगूड या ठिकाणी ही सभा होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली . संदीप भारमल, अशोक चौगुले, दत्तात्रय साळोखे, समाधान हेंदळकर, गजानन साळोखे, बबन बाबर, अमोल पाटील, राणोजी गोधडे, सचिन मेंडके, प्रशांत मोरबाळे ,गजानन मोरबाळे, विजय गोधडे, विजय आडव आदी उपस्थित होते. मुरगूड मध्ये ही सभा असल्यामुळे राजू शेट्टी या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.