मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मधील जवाहर रोड ‘झिंदाबाद ‘असे थोडे उपहासाने म्हणण्याची वेळ आली आहे. याची कारणे सुध्दा तशीच आहेत. एक तर हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे.मुरगूड मध्ये येणारी सर्व प्रकारची वाहने या रस्त्याने ये -जा करतात .
हा रस्ता खड्ड्यांनी इतका व्यापला आहे की प्रसिद्ध विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी म्हंटल्याप्रमाणे रत्यात खड्डे आहेत की खड्ड्यातून रस्ता गेलाय हेच समजेनासे झाले आहे.
हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत किंवा देखरेखी खाली आहे असे नगरपरिषद म्हणते त्यामुळे त्याची दुरुस्ती जिल्हा परिषदेने करावी असं त्यांचे म्हणणे आहे. तर जिल्हा परिषद म्हणते की नगर परिषदेने पाण्याच्या कनेक्शन साठी जागोजागी रस्त्यावर खड्डे पाडले आहेत त्यामुळे रस्ता खड्ड्यांनी भरला आहे.त्यांनी तो दुरुस्त करावा.
‘ना घरका ना घाटका’ अशी रस्त्याची अवस्था झाली आहे.
या रस्त्या बाबत नागरिकांच्या आणि विशेषतः जागरूक सामाजीक कार्यकर्त्यांच्या अशाच परखड प्रतिक्रिया व्यक्त केल्याआहेत.
या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करण्याकरिता या खड्ड्यात पावसाळी वृक्षारोपण करून टाकले.
अशा कडव्या प्रतिक्रियांमुळे संबंधित प्रशासनास जाग यावी हाच उद्देश आहे. जर रस्ता दुरुस्तीचा मार्ग निघाला नाही तर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सुध्दा शिवभक्त व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
या आंदोलनात किशोर पोतदार, शिवभक्त सर्जेराव भाट, गणपती लोकरे, बाबुराव रेंदाळे,शंकर परीट,मंदार जाधव,सुरेश लोकरे,विशाल कापडे ,आकाश रेंदाळे,भिकाजी लोकरे,अरुण मेंडके,निलेश रामाणे ,जगदीश गुरव,सूरज मोरबाळे,महादेव पाटील आदिसह कार्यकर्ते आंदोलक सहभागी झाले होते .