कागल : सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कागल इथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे, विशेष कार्य अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मा.श्री मंगेश चिवटे सर आणि कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रशांत साळुंखे यांनी काल सदिच्छा भेट दिली.
अगदी काहीच दिवसांपूर्वी सिटी प्राईडमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत अपघातातील रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक तरतुदीची सुविधा सुरु झाली. अल्पावधीतच या सुविधेचा अनेक गरजू रुग्णांना लाभ होऊ लागला. अगदी कमी वेळात हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्ण आणि नातेवाइकांचे सहकार्य मिळवत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षासोबत सुसंवाद करून योग्य ती पुर्तता केली जाते.
मंगेश चिवटे यांनी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. तुषार भोसले यांच्याकडून हॉस्पिटलची कार्यपद्धती येथील सुविधा, रुग्णांचा प्रतिसाद आणि हॉस्पिटलची व्यवस्था या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेतली व या बाबत समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडून हॉस्पिटलला काही अडचणी येतात का याबद्दलही सविस्तर चर्चा केली. इतक्या कमी वेळात रुग्णांचा सिटी प्राईडमधल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी हॉस्पिटलकडून योग्य ते सहकार्य मिळत आहे याबद्दल देखील त्यांनी समाधान व्यक्त केले.