सुमारे ७० रक्तदात्यांनीं केले रक्तदान
मुरगूड ( शशी दरेकर ) : सामाजिक बांधिलकी जपत मुरगूड ता . कागल येथिल श्री साईबाबा गणेश तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिक, युवक तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात सुमारे ७० रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
“रक्तदान हे श्रेष्ठदान ” मानले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे तसेच विविध आजारांमुळे रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गरज लक्षात घेऊन मंडळाने सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

शिबिरात रक्तदात्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सदस्य किरण मडीलगेकर, विशाल सूर्यवंशी, गौरव साळोखे, चेतन घाटगे, श्रेयश ढेरे, निखिल कलकुटकी, संग्राम साळोखे आणि मकरंद धर्माधिकारी यांच्यासह मंडळाच्या सदस्यानीं विशेष परिश्रम घेतले. तसेच सीपीआर कोल्हापूर रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने रक्त संकलन व वैद्यकीय व्यवस्थेसाठी सहकार्य केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देत मंडळाने राबविलेल्या या रक्तदान शिबिरातून ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’ हा सामाजिक संदेश देण्यात आला. यावेळी रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सामाजिक एकोपा आणि सेवा कार्याचे दर्शन घडले.