खलनायकी प्रवृत्तीला जनता कधीही थारा देणार नाही – पालकमंत्री हसन मुश्रीफ
कागल (विक्रांत कोरे) : आपला विरोधक तुरुंगातच गेला पाहिजे, त्याचं कुटुंब तुरुंगात गेलं पाहिजे, मगच आपण आमदार होऊ या भावनेने पछाडलेले व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आहे. अशा नतद्रष्ट, खलनायक प्रवृत्तीच्या व्यक्तीला कागलची जनता लोकप्रतिनिधी करणार का? असा सवाल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांनी केला.
वंदूर ता. कागल येथे विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ व शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. यावेळी गोकुळ संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, रमेश तोडकर, धनराज घाटगे, सरपंच मालुबाई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, तुम्ही विरोधकाचे चरित्र तपासून पहा. संजय गांधी निराधारच्या तक्रारी त्यांनी केल्या. अनेक निराधार माता- भगिनींच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम त्यांनी केलं. तसेच; सिद्धनेर्लीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दलितांना दिलेल्या जमिनी त्यांनी काढून घेतल्या. त्यासाठी दहा ते वीस कुटुंब रस्त्यावर येऊन उपोषण करत आहेत. एवढी प्रॉपर्टी, जमिनी असताना हा अट्टाहास कशासाठी चालू आहे? असा त्यांनी सवाल केला. शंभर वर्षांपूर्वी दलितांना दिलेली जमीन त्यांनी काढून घेतली. त्यामुळे आपण कोणाच्या हातात सत्ता देणार आहोत? म्हणून अशा खलनायकी प्रवृत्तीच्या विरोधात ठाम उभे रहा. मी कधी जात- धर्म बघितला नाही की पक्ष -पार्टी बघितली नाही. येणारा माणूस हा हसत कसा जाईल, असं आयुष्यभर मी बघत राहिलो.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या पाठिंबामुळे मला दहा हत्तीचे बळ मिळाले आहे. निवडणुकीपूर्वी एका राजकीय नेत्याने पाठिंबा देण्याची सोपी गोष्ट नाही. २५ वर्षे बाबांकडे सत्ता नाही. सत्तेशिवाय कार्यकर्त्यांना सांभाळून त्यांना उत्साही ठेवणे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे हे फार मोठं काम संजयबाबांनी केले आहे. त्यांनी मला पाठिंबा देताना निर्णय घेतलेला होता. गोरगरीब माणसांचे कल्याण, ज्या भागात पाणी पोहोचलेले नाही व माझ्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल व तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतील. मी बाबांना शब्द देतो की, ही संधी देण्यासाठी आपण पाठिंबा दिला मोठ्या मनाने माझ्या मागे राहिला, मला दहा हत्तीच बळ दिलं. सत्तेचा उपयोग तुमच्या कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी सत्तेचा करीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तरच मते द्या…….!
मी काम घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. तुम्ही मला मत देताना आंधळेपणाने मते देऊ नका. थर्मामीटरमध्ये माझी कामे बघा, त्या थर्मामीटरमध्ये मी उत्तीर्ण होणार असेल तरच मला मत द्या, असेही मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले.
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक, माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, मंत्री मुश्रीफ सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत अविश्रांतपणे काम करतात. सत्तेचा वापर ते गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी करतात. ते महाराष्ट्रातील असे एकमेव नेते आहेत. त्यांचा दरवाजा सर्वांसाठी सदैव उघडा असतो. माझी मागणी नसतानाही त्यांनी मला जिल्हा बँकेत संचालक केले. आमच्या गटाचे कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वात पुढे असतील, असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी धनराज घाटगे, सरपंच मालुबाई कांबळे, युवराज कांबळे, एम. एस. कांबळे, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत उत्तम कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुराज घाडगे यांनी केले तर प्रास्ताविक पुंडलिक खोडवे यांनी केले कार्यक्रमास, उपसरपंच रामचंद्र लोकरे, धनश्रीदेवी घाटगे, बबन खोडवे, पारिसा जंगटे, धनाजीराव घाटगे, तानाजी बागणे, शिवसिंह घाटगे, अनिल गुरव, बबन रणदिवे, बाळासो घाटगे, नामदेव चौगुले, बाबुराव हंचनाळे, बापूसो इंगळे, डॉ. विजयसिंह इंगळे, रवींद्र बागणे, गणपतराव कांबळे आदींसह नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.