कागल येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राजवीरचा भव्य सत्कार
कागल (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील ३८ किलो वजनी गटात पैलवान राजवीर सतीश पोवार याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मानाचे सुवर्णपदक पटकावले. या दैदिप्यमान विजयाच्या जोरावर नवी दिल्ली येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी (National Wrestling Championship) त्याची महाराष्ट्र राज्य कुस्ती संघात निवड झाली आहे.
राजवीर हा कंदलगाव येथील ‘जागतिक कुस्ती आखाडा’ येथे नियमित सराव करतो. त्याला एन.आय.एस. (NIS) कुस्ती प्रशिक्षक गौरव पाटील, एन.आय.एस. प्रशिक्षक सागर देसाई तसेच वस्ताद मारुती पोवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या यशामुळे क्रीडा वर्तुळातून त्याचे कौतुक होत आहे.

कागलच्या पैलवान गणपत आखाड्यात जल्लोष व सत्कार सोहळा
राजवीरच्या सुवर्ण विजयाची बातमी समजताच कागल येथील ऐतिहासिक ‘पैलवान गणपत आखाडा’ येथे कुस्तीप्रेमींनी मोठा जल्लोष साजरा केला. याप्रसंगी त्याचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सदर सत्कार प्रसंगी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (KDCC) संचालक भैयासाहेब माने, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर (तात्या), बिद्री साखर कारखान्याचे संचालक, आशियाई सुवर्णपदक विजेते, ऑल इंडिया रेल्वे चॅम्पियन तथा उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय विकास पाटील, नितीन दिंडे, सतीश घाटगे, वस्ताद मारुती पोवार, राजवीरचे वडील सतीश पोवार, प्रशिक्षक गौरव पाटील, सागर देसाई, प्रणव मोरे, मित्र परिवार व परिसरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राजवीर महाराष्ट्राचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून राष्ट्रीय पातळीवरही बाजी मारेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.