कोल्हापूर, दि. 14 : चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व घराघरांत पोहोचवणे गरजेचे आहे, यासाठी जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबवावेत, असे सांगून 5 मार्च रोजी रन फॉर हेल्थ रन फॉर मिलेट (पौष्टिक तृणधान्य जनजागृती दौड) आयोजित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपक्रम
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा कार्यकारी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा माता, बाल संगोपन अधिकारी डॉ. वंदना जोशी, जिल्हा पणन अधिकारी चंद्रकांत खाडे, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ. योगेश बन तसेच समिती सदस्य उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय आवारात विविध तृणधान्ये व त्यापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांच्या स्टॉलला जिल्हाधिकारी श्री. रेखावार व समिती सदस्यांनी तसेच मान्यवरांनी भेट दिली. तृणधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांच्या स्टॉलला भरघोस प्रतिसाद मिळाला, प्रत्येक स्टॉल वरील पदार्थांची अल्पावधीतच विक्री झाल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, पौष्टिक तृणधान्यांचे आहारात खूप महत्व आहे. सर्व शासकीय कार्यालये, शासकीय दवाखान्यांमधील दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा, अशा सूचना देवून प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, वसतिगृहांत देखील या आहाराचा समावेश करता येईल का याबाबत विचार करावा, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
शासकीय कार्यालये, दवाखान्यांतील आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश
नागरिकांनी आहारात तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी कृषी विभाग व अन्य विभागांनी मिळून विविध उपक्रम राबवावेत. याबाबत व्यापक जनजागृतीसाठी बाईक रॅली, पाककला स्पर्धा, तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आदी उपक्रमही राबवावेत. यात महिला बचत गटांचा सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
तृणधान्यांचे महत्त्व शालेय जीवनातच समजण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करुन यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करा. यात विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी करुन घ्या, जेणेकरुन तृणधान्यांचे महत्व घराघरांत पोहोचेल. तृणधान्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच आहारातील वापर वाढण्यासाठी सर्व विभागांनी मिळून प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जाहीर झाले असून यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली.
Your posts always provide me with a new perspective and encourage me to look at things differently Thank you for broadening my horizons