बातमी

राजर्षी शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया

उपक्रमात सहभागी होण्याचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-2023 अंतर्गत प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आज शाहू मिलमध्ये उद्घाटन

कोल्हापूर, दि. 5 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आहे त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया, असे आवाहन जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, संस्था, शैक्षणिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे विचार आणि कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमात मंत्री महोदय, सर्व लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकारी, पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, तरुण मंडळांचे प्रतिनिधी, बँकर्स, ग्राहक, बचत गटांचे सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

शाहू महाराजांच्या समाधी स्थळी सकाळी 9.30 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात येणार आहे. यानंतर सर्वजण 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आहे त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करणार आहेत.

राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व-2023 कार्यक्रमाचे उद्घाटन श्री छत्रपती शाहू मिलमध्ये सकाळी 10.30 वाजता होणार असून दिवसभरात होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. दिनांक 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनी सकाळी 10 वाजता आहे त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन.

सकाळी 10.30 वाजता पालकमंत्री ‍दीपक केसरकर यांच्या हस्ते शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व 2023 समारोप कार्यक्रम व प्रदर्शनाचे उद्घाटन.

दुपारी 2 ते 5 वाजता शाहू मिल मध्ये “छत्रपती शिवाजी 1952” चित्रपट प्रसारित करण्यात येणार आहे.

याच ठिकाणी संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत लोककला व स्थानिक पारंपरिक कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत.

याबरोबरच दि. 6 ते 14 मे या कालावधीत जिल्ह्यातील प्रसिद्ध वस्तू, विविध उत्पादनांची विक्री व प्रदर्शन शाहू मिल येथे होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गूळ, कापड, चप्पल, चांदी व सोन्याचे दागिने, माती व बांबूच्या वस्तू, घोंगडी, जान, दुग्ध उत्पादने, खाद्य पदार्थ, तांदूळ, मिरची, मध, काजू, रेशीम, तृणधान्य व वन उत्पादने आणि आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *