मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता-कागल येथील आनंदा लक्ष्मण कांबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले. या दुर्देवी निधनाने विधवा झालेल्या त्यांच्या पत्नी उज्ज्वला आनंदा कांबळे यांच्या कुटुंबियांनी शाश्वत विकास चळवळीचे प्रणेते प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार व विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विधवा अवमान प्रथा रोखण्याच्या निर्णय घेतला. आनंदा कांबळे यांच्या शोकसभेत या निर्णयाचे स्वागत करत उपस्थितांनी तिला सार्वजनिक, सांस्कृतिक व इतर सर्व ठिकाणी विवाहीत स्त्रीयांप्रमाणेच वागणुक देण्याचा संकल्प विधवा सन्मान शपथ घेवून केला.
पतीच्या मृत्युनंतर पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे, विशिष्ट रंगाची साडी परिधान करणे,गळ्यातील मंगळसूत्र काढणे, पायातील जोडवी काढणे, विधवा स्त्रीने कोणत्याही प्रकारचे अलंकार घालायचे नाहीत. अशा विषमतावादी कालबाह्य प्रथा आजही सुरू आहेत. अशा प्रथांमुळे विधवा स्त्रियांचं जगणंच अवमानकारक आणि अन्यायग्रस्त होतं. महिलांच्या नैसर्गिक हक्कांवर ,अधिकारांवर गदा येते आणि मानवी कायद्याचा भंग होतो. त्यामुळे सतीची चाल, केसवेपन, बालविवाह, नरबळी, अस्पृश्यासाठी मंदीर प्रवेश बंदी या प्रथांप्रमाणेच विधवा अवमान प्रथा रोखून विधवांचा सन्मान करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे असं मत शाश्वत विकास चळवळीचे युवा विभागाचे प्रमुख विकास सावंत यांनी विधवा सन्मान शपथ देताना व्यक्त केले.
निढोरीकरांनी घेतली अशी शपथ
आम्ही 21व्या शतकातील प्रगत नागरीक आज अशी शपथ घेतो की, नवऱ्याचा दुर्दैवी मृत्यूनंतर विधवा झालेल्या श्रीमती आनंदा लक्ष्मण कांबळे यांना विधवा म्हणून समाजात रूढ असलेल्या अपमानकारक चालीरिती यांना फाटा देवून त्यांना समाजात सधवांप्रमाणेच समानतेची वागणूक देवू, त्यांचा कुटुंबातील आणि समाजातील सन्मान, त्यांचे अधिकार आणि त्यांची सुरक्षितता याबाबत आम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करण्याची आज शपथ घेत आहोत.
अशा आशयाची प्रतिज्ञा शाश्वत विकास चळवळचे व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे युवा विभाग कार्यवाहक विकास सावंत यांनी उपस्थितांना दिली. या प्रतिज्ञापत्राचा नमुना शाश्वत विकास चळवळीचे प्रणेते आणि सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार यांच्या संकल्पनेतून बनविला आहे.
या शोकसभेत बिद्री साखरचे माजी व्हा. चेअरमन सुनिल सुर्यवंशी, संजय कांबळे, विकास सावंत, आक्कुबाई कांबळे, दलितमित्र एकनाथ देशमुख,उज्ज्वला कांबळे, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव सचिन सुतार, प्रा.डॉ प्रदीप कांबळे, निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील, एकनाथ कांबळे, बिद्री साखरचे माजी संचालक केशवकाका पाटील, प्रभाकर कांबळे,सुरेश सुर्यवंशी, पी .एस. कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बी. एम. कांबळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.