बातमी

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया – आमदार हसन मुश्रीफ

आजरा, दि.०५: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. भविष्यात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एकचा पक्ष असेल, असेही ते म्हणाले. आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्तरावरून ते बोलत होते.

आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या अडीच वर्षाच्या काळात अनेक रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात यश आले. २२ वर्षापासून रखडलेला आंबेओहोळ प्रकल्प नुकताच पूर्ण झालेला आहे. उचंगी प्रकल्पाचीही तीच अवस्था होती. तो प्रकल्पही पूर्णत्वाला आला आहे.

आमदार राजेश पाटील म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने आंबेओव्हळ प्रकल्प पूर्ण झाला आहे. उचंगी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत लवकरच पाणीपूजन करू.

माजी आमदार के पी पाटील म्हणाले, गद्दारी फार काळ टिकत नाही. कुणी 25 कोटी तर कोणी 50 कोटी रुपये घेतलेल्या चर्चा आहेत. भविष्यात गद्दारांना जवळ घेऊ नका. जनता त्यांना धडा शिकवेलच. कोटी -कोटी घेऊन गेलेल्यांना लोळवुया.

यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, तालुका अध्यक्ष मुकुंददादा देसाई, आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी पंचायत समिती सभापती विष्णूपंत केसरकर आदी प्रमुखांची भाषणे झाली.

स्वागत केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी केले. सूत्रसंचालन यांनी केले.

“नाळ जनतेशी…….”
केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, सत्ता असो वा नसो. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहतील. कार्यक्रमाला आमदार हसन मुश्रीफ साहेब येणार म्हटल्यावर उभ्या मुसळधार पावसातही हजारोंची उपस्थिती आहे. जनतेचे हे प्रेम असंच राहील.

“तर रस्त्यावर उतरू……..”
श्री. मुश्रीफ म्हणाले, राजकीय अभिनिवेशातून येणाऱ्या काळात जनतेची कामे होणार नसतील, गोरगरिबांवर अन्याय होणार असेल तर रस्त्यावर उतरू. लोकशाही मार्गाने धरणे, मोर्चे व आंदोलन करू.
………..

आजरा -येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार हसन मुश्रीफ. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार के. पी. पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, केडीसीसी संचालक सुधीर देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे व इतर प्रमुख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *