कोल्हापूर : भारतीय ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांनुसार तिरंगा ध्वज असल्याची खात्री करुनच स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना झेंडे वितरीत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांनुसार झेंडे योग्य आकाराचे असल्याची खात्री त्या-त्या तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, समन्वय अधिकाऱ्यांनी करुनच नागरिकांना झेंडे वितरीत करावेत. तसेच नागरिकांना मोफत झेंडे उपलब्ध करुन देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या झेंड्यांशिवाय जिल्ह्यातील खासगी उत्पादक व विक्रेते यांनीही बाजारपेठेत विक्रीसाठी मुबलक प्रमाणात झेंडे उपलब्ध करुन द्यावेत, जेणेकरुन नागरिक बाजारपेठेतूनही झेंडे खरेदी करु शकतील, असेही जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले.
त्या-त्या तालुल्यातील गावांमध्ये झेंड्यांचे वितरण योग्य पध्दतीने होण्यासाठी झेंडा वितरण केंद्र स्थापन करा. या केंद्रांमध्ये जमा व वितरीत होणाऱ्या प्रत्येक झेंड्याची पाहणी करा. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा. नागरिकांनी झेंडा आपल्या घरावर सरळ उभ्या पध्दतीने लावावा, असे सांगून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोल्हापूर शहरात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. यानिमित्ताने शहरात विविध स्पर्धा, उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, हर घर तिरंगा उपक्रम ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविण्यासाठी गावनिहाय नियोजन करा. विशेष ग्रामसभा, प्रभात फेरी, विधवा महिलांच्या हस्ते झेंडा वंदन, आजी-माजी सैनिकांच्या हस्ते झेंडावंदन करण्यासाठीही नियोजन करा. प्रशासनाकडे प्राप्त होणारा प्रत्येक झेंडा ध्वज संहितेतील नियमानुसार योग्य असल्याची खात्री करुन मगच नागरिकांना झेंडा वितरीत करा. यासाठी तरुण मंडळांसह अधिकाधिक लोकांचा सहभाग घ्या, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, पोलीस विभागाच्या वतीने या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरासह सर्व तालुक्यांमध्ये अमृतमहोत्सवी दौड, सायकल फेरी, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत.