मुरगूड ( शशी दरेकर ) : एकविसाव्या शतकात प्रामाणिपणाचा बुरखा घालून अनीतिमान काम करणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. पण प्रत्यक्षात मात्र प्रामाणिकपणा हरवत चाललेला पाहायला मिळतो. पैशाच्या हव्यास पोटी दिवसाढवळ्या फसवणूक करणार्या अनेक बातम्या आपण सोशल मीडिया मध्ये ऐकत असतो किंवा आजुबाजुला घडताना दिसत आहेत.अशा परिस्थितीत एखाद्याकडुन प्रामाणिक वागण्याची अपेक्षा धरणं हा चेष्टेचा विषय ठरू शकतो. हे जरी खरं असलं तरी समाजामध्ये अजूनही काही प्रामाणिक माणसं आहेत यांचं जिवंत उदाहरण म्हणजे मुरगुडचे परीट बंधू.या बंधूंनी चक्क इस्त्री करताना सापडलेल्या लाखो रूपये किमतीच्या तीन अंगठ्या त्या अंगठी मालकाला सुपूर्द केल्या.त्यांच्या या प्रामाणिकपणाचे मुरगुड आणि मुरगुड पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.
मुरगुड ता.कागल येथील भाऊ परीट व सुरेश परीट हे दोघे भाऊ-भाऊ आहेत.या दोघांचा मुरगुडातील कापशी रोडला विजया ड्रायक्लिनर्स या नावाने छोटेखानी लाॅंड्री व्यवसाय आहे.त्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांची रेलचेल नेहमीच असते.24 मार्च रोजी सकाळी इस्त्री करताना नगरपरिषदेचे कर्मचारी असणार्या रणजित कदम यांच्या कपड्यांमधुन आलेल्या तीन अंगठ्या या दोघां बंधुना सापडल्या. निरखून पाहिल्या नंतर या अंगठ्या सोन्याच्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा कोणताही विलंब न लावता त्यांनी रणजीत कदम या गिऱ्हाईकाला बोलावून घेतले व ओळख पटवून लाखो रुपये किंमतीच्या या अंगठ्या त्यांच्याकडे सुपूर्द केल्या.
त्यावेळी या घडलेल्या सर्व अनपेक्षित घडामोडीं या रणजित कदम यांच्यासाठी सुखद धक्का देणार्याच ठरल्या.
आनंदाने शहारून गेलेल्या रणजित कदम यांनी या बदल्यात बक्षीस म्हणून काय द्यायचे ?अशी विचारणा परीट बंधुना केली असता,त्यांनी बक्षीस घेण्यास थेट नकार दर्शविला व”जी वस्तू माझी नाही ती वस्तु मलाच मिळाली पाहिजे असं वाटणं हि लोभीवृत्ती आहे.त्यामुळे आम्ही या मौल्यवान वस्तू ज्यांच्या आहेत त्यांना परत केल्या यात विशेष असं काही नाही.”अशा भावना या बंधूंनी व्यक्त केल्या.
त्यावेळी रणजित कदम व त्यांच्या मित्रपरीवाराने बुके देऊन या बंधूंचे कृतज्ञतापूर्वक कौतुक केले. या प्रामाणिकपणाच्या कृत्याची बातमी संपुर्ण परिसरात पसरत आहे.त्यामुळे अनेक स्तरातून भाऊ परीट व सुरेश परीट यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अनेकांनी प्रत्यक्षात भेटून तर काहींनी फोन काॅलद्वारे या बंधूंचे अभिनंदन केले.