बातमी

सुळकूड योजनेविरोधात १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सुळकूड येथील बैठकीत निर्णय; हजारो शेतकरी सहभागी होणार

सुळकूड : इचलकरंजी शहराच्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मंजूर झालेली १६०.८४ कोटींची पाणीपुरवठा योजना रद्द व्हावी, या मागणीसाठी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता दूधगंगा बचाव कृती समितीमार्फत मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

मोर्चात दूधगंगाकाठच्या सुळकूड, कसबा सांगाव, मौजे सांगाव, रणदिवेवाडी, लिंगनूर, करनूर, वंदूर, दानवाड, दत्तवाड, घोसरवाड या गावांतील हजारो शेतकरी भाग घेणार आहेत. येथील पंचायतीत दूधगंगा बचाव कृती समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सदासाखरचे संचालक कैलास जाधव होते.

वारणा योजना रद्द करण्यासाठी दानोळी, कोथळी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या योजनाबद्ध चळवळीप्रमाणेच जनआंदोलन उभारून सुळकूड योजनेचे भूत गाढून टाकू, असा विश्वास अमोल शिवई यांनी व्यक्त केला.

मंगळवारी (दि.८) सुळकूड, गुरुवारी कसबा सांगाव आणि शनिवारी मौजे सांगाव व रणदिवेवाडी याप्रमाणे गावबंद आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीस सुळकूडचे उपसरपंच शरद धुळगुडे, पप्पू खानगोंडा, सुकुमार हेगडे, डॉ. अरुण मुद्दाण्णा, सचिन भोसले, कसबा सांगावचे पांडू पाटील, विनायक आवळे, बसय्या स्वामी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.

कागल तालुक्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांसाठी ज्या-त्या पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते नेहमी झटत असतात. त्यामुळे आमच्या शेतीच्या पाण्याच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर साकडे घालून त्यांना या आंदोलनात सहभागी होणे भाग पाडू.
चंद्रकांत पाटील, सुळकूड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *