मेक इन कोल्हापूर उपक्रमाचा शुभारंभ
कागल(प्रतिनिधी) :
कोल्हापूरच्या मातीत छोट्या स्वरूपात व्यवसाय सुरू करून यशस्वी झालेल्या स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून, राजे बँकेच्या पुढाकारातून स्थानिक युवकांना उद्योजक बनविण्याचे व्यासपीठ म्हणजे मेक इन कोल्हापूर उपक्रम आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे राजे बँकेच्या माध्यमातून साकारलेल्या मेक इन कोल्हापूर या उपक्रमाच्या शुभारंभवेळी ते बोलत होते. या उपक्रमाच्या लोगोचे व वेबसाईटचे अनावरण शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते झाले.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, मेक इन इंडिया’ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन स्थानिक छोट्या युवकांना मोठे उद्योजक बनविण्यासाठी, बहूजन समाजातील बारा बलुतेदार, अठरा पगड जातीच्या समाजातील होतकरू युवकांना व्यवसायाचे एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ‘मेक इन कोल्हापूर’ही संकल्पना तयार करण्यात आली आहे.
ज्यात कोल्हापूर शहरासोबत छोट्या शहरातील व ग्रामीण भागातील व्यावसायिकांना कोल्हापूरच्याच नामांकित ब्रँड्स बरोबर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन, आर्थिक साहाय्य अशा विविध सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.
तरूणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून स्वावलंबी व्हावे व इतरांना रोजगार द्यावा, हा याचा उद्देश आहे. स्व विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या स्वप्नातील हा उपक्रम असून ते असते तर त्यांनाही अभिमान वाटला असता. मात्र त्यांचे स्वप्न आज साकार होत आहे.
याला ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल. यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, बाळ पाटील, बाबगोंडा पाटील, भगवानराव काटे, सागर कोंडेकर, राजेंद्र तारळे, प्रसन्न बदानी, संदीप सावंत, शबान शेख, हर्ष मेंगाणे, सागर पाटील, बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांच्यासह सर्व संचालक व शाहू ग्रुपमधील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुक उपस्थिती होती.
यावेळी सांगली मनपाचे नगर अभियंता संजय देसाई,’बिद्री’चे संचालक बाबासाहेब पाटील, नगरसेविका सौ.विजया निंबाळकर, डिक्कीचे प्रसन्न भिसे, दत्त भेळचे बाबासो घुणके, लाडाची कुल्फीचे प्रतिक दिंडे, सलगर चहाचे दादू सलगर, कोल्हापूरी पायताणचे अनुराग कोकितकर, अमित पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत संचालक प्रकाश पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष नंदकुमार माळकर यांनी मानले.
,,,तर कोल्हापूरला मोठे होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
शंभर वर्षापूर्वी रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरी पायताणला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ उपल्बध करून दिले.तोचा वारसा समरजितसिंह घाटगेंसारखे अभ्यासू नेतृत्व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मेक इन कोल्हापूरच्या माध्यमातून पुढाकार घेत आहेत .त्यामुळे आता कोल्हापूरला मोठे होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असा विश्वास कोल्हापूरी पायताणचे अनुराग कोकितकर यांनी यावेळी व्यक्त केला.
‘‘शाहूं’चा वारसा राजे चालवित आहेत
रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानमध्ये सर्वसमावेशक कार्य केले.त्यांच्या रक्ताचे वारस असलेले समरजितसिंहराजे राजकारण,मतदारसंघ याच्या पलिकडे जाऊन बहूजन समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करीत आहेत.ते ‘शाहूं’चे रक्ताचे वारस तर आहेतच पण कार्याचेही ते वारस आहेत.असे गौरवोद्गार सांगली मनपाचे नगर अभियंता संजय देसाई यांनी काढले.