शनिवार दिनांक 6 मे 1922 रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी राजर्षी शाहू छत्रपती महाराज करवीर यांना मुंबई येथे पन्हाळा लॉज मध्ये काळजाच्या विकाराने अकस्मात देवाज्ञा झाली. महाराजांच्या निधनाने राबणारा शेतकरी, मागासवर्गीय समाजाचे बांधव, भटक्या विमुक्त जातीचे गरीब लोक हे सर्वजण पोरके झाले. महाराजांचा या लोकांना आधार होता. ही माणसे महाराजांना परमेश्वर मानत होती. त्यामुळे सर्वांना अतिशय दुःख झाले. महाराजांच्या निधनाची बातमी पुण्यातील जेथे मेन्शन मधील बाबुराव जेधे यांना कळवण्यात आली. त्यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना कळविण्यात आले. ब्राह्मणेत्तर चळवळीतील कार्यकर्ते भांबावून गेले. ब्राह्मणेत्तर चळवळीचा आधार, पाठीराखा आपल्यातून निघून गेला होता. ब्राह्मणेत्तर चळवळ पोरकी झाली होती. पित्याप्रमाणे सांभाळणारा वडीलधारी माणूस निघून गेला होता.
सत्यशोधक चळवळीचा इतिहास म्हणजेच राजर्षी शाहू
राजर्षी शाहू महाराज बडोद्यास लग्नासाठी गेले होते. असे घडेल असे कुणालाच वाटत नव्हते. महाराजांची दणकट आणि पिळदार शरीरयष्टी पाहिल्यास अजून पाच पन्नास वर्ष महाराजांना काही होणार नाही असे वाटत होते. पण अतिशय वाईट घडले होते. जगाचा इतिहास म्हणजे त्या काळातील विभूतींनी केलेल्या पराक्रमाचा इतिहास होय. समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भक्तांना सांभाळणारा, त्यांना जीवनदान देणारा पिता म्हणून राजर्षी शाहू महाराजांकडे पाहिले जाते. सत्यशोधक चळवळीचा इतिहास म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास म्हणता येईल.
कीर्ती आणि बडेजाव महाराजांच्या कधी स्वभावातही नव्हते. करारी बाणा, विशाल गुणग्राहकता आणि खरेखुरे ते लोकसेवक होते. महाराजांची कार्यपद्धती लोकाभिमुख होती. महाराज मोठ्या अंतकरणाचे होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर विष्णुशास्त्री चिपळूणकर सतत विखारी टीका करीत असत. परंतु विष्णुशास्त्री यांच्या निधनाच्या वेळी रानडे यांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू आले.
लोकमान्य टिळकांचे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे टोकाचे वैर होते. पुण्यातील संपूर्ण ब्राह्मणवृंद शाहू महाराजांच्या विरोधात होता. लोकमान्य टिळक या मंडळींचे नेतृत्व करीत होते. पुण्यातील ब्राह्मण मंडळी सतत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची बदनामी करीत होती. कोल्हापुरात त्यांचे काही हस्तक गुप्तपणे महाराजांच्यावर कटकारस्थान करीत होती. महाराजांचा घातपात करण्याचाही काही वेळा प्रयत्न झाला. तरीही ज्यादिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू झाला ही बातमी कोल्हापुरात राजवाड्यात समजली त्यावेळी शाहू महाराज भोजन घेत होते. ती बातमी कानावर येतात महाराजांनी जेवणाचे ताट अर्ध्यावरच बाजूला सारले आणि स्वतः उपास केला. टिळकांनी त्रास दिला तरीही टिळकांच्या मृत्यूच्या बातमीने महाराजांना अतीव दुःख झाले.
सुप्रसिद्ध लेखक वि.स.खांडेकर महाराजांच्याबद्दल म्हणाले, अन्यायाच्या विरोधी लढताना ते वज्र कठोर बनत, पण वंचित आणि दुःखितांच्या दर्शनाने ते कोमल हृदयी होत असत.’ पृथ्वीच्या पाठीवर अनेक सम्राट झाले असतील. अनेक राजाधिराज गाजून गेले असतील. पण समाजाच्या तळाच्या मानवतेवर माणूस म्हणून मायेची पाखर घालणारे राजे फार थोडे झाले असतील. राजर्षी शाहू महाराज हे त्यापैकीच एक. थोर साहित्यिक पु.ल.देशपांडे म्हणतात, ‘शाहू महाराज हा किती मोठा राजा होता यापेक्षा तो किती मोठा माणूस होता हे पाहणे मनाला आनंद देणारे आहे.’
अस्पृश्यता निवारणासंबंधी महाराष्ट्रात पोटतिडकीने विचार मांडणारे पहिले महात्मा ज्योतिबा फुले होते. त्यांच्यानंतर योजनाबद्ध पद्धतीने शासकीय व वैयक्तिक पातळीवर अस्पृश्यता निर्मूलन करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय. दलितांना न्याय मिळाला पाहिजे हे ठणकावून सांगणारा पहिला राज्यकर्ता म्हणून महाराजांचा उल्लेख करावा लागेल. जगातील मानवतावादी राजा म्हणून लौकिक मिळवण्याचा पहिला मान छत्रपती शाहू यांना मिळाला. म्हणून तर त्यांना ‘राजर्षी’ म्हणून संबोधले जाते. राजकारण आणि समाजकारण यात गुंतून गेलेला हा राजा सांस्कृतिक क्षेत्राला विसरला नाही. नाटक, संगीत, चित्रकला, शिल्पकला, तमाशा, कुस्ती या क्षेत्रात त्यांनी गुणी माणसांना सतत प्रोत्साहन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुणी नेतृत्वाबद्दल महाराजांच्या मनात फार मोठा आदर होता. म्हणून महाराजांनी दलित समाजाला बाबासाहेबांचा सल्ला ऐका असे सतत सांगण्याचा प्रयत्न केला.
राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी खरी ठरली. बाबासाहेब देशातील सर्व दलित समाजाचे नेते ठरले. डॉ. आंबेडकरांनी देशाला सुंदर अशी घटना देऊन ते अजरामर झाले. २ एप्रिल १८94 व्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. त्यांनी त्यावेळी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यातून प्रजेच्या कल्याणाची व भरभराटीची इच्छा व्यक्त केली. प्रजाजनानी शुद्ध अंतःकरणाने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मागणी करून तशी परमेश्वराकडे प्रार्थना केली.
राजर्षी शाहू महाराज ज्यावेळी शिकारीला जात त्यावेळी लवजम्यासाठी खरेदी करावयाची बकरी, कोंबडी व इतर तांदूळ, अंडी साहित्य प्रजेकडून फुकट घेऊ नये पैसे देऊन विकत घ्यावे, रयतेवर कोणत्याही प्रकारचा जुलूम होता कामा नये असा जाहीरनामा काढला. गरीब लोकांची जनावरे दवाखान्यात ठेऊन घेऊन त्यांचा चारा वैरणीचा खर्च स्वतः केला. काम करीत असताना हात न सापडेल असा घाणा तयार करणाऱ्याना बक्षिसे जाहीर केली. ऊस लावताना बोटे सापडू नयेत व दुखापत होऊ नयेत याची खबरदारी महाराज घेत होते. 1902 साली दुष्काळात जलसिंचन धोरण जाहीर केले. अधिकारी नेमणूक करून गावतळी व विहिरी यांचा सर्वे करण्याचा पहिला जाहीरनामा काढला. प्लेगच्या साथीत गावाबाहेर झोपड्या बांधताना गरिबांना मोफत झोपड्या बांधून दिल्या. गावाबाहेर जाऊन घरे बांधून राहावे असा आदेश दिला. अशी अनेक कामे सांगता येतील.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कागलच्या कसदार मातीत जन्माला आले याचा आम्हाला सर्व कागलवासियांना अभिमान आहे. राजर्षींनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा आणि विचारांचा वारसा चालविला. महाराज विसाव्या शतकातील अग्रगण्य समाजसुधारक होते. राजघराण्यात जन्म घेऊनही शेतामध्ये काबाडकष्ट करणारा शेतकरी त्यांना आपला वाटला. शाहू महाराज राजकीयदृष्ट्या मवाळ वाटत असले तरी सामाजिकदृष्ट्या जहाल होते.
समाजातील अनिष्ट रूढी, परंपरेचा महाराजांना तिटकारा होता. राजार्षींचा दलितांकडे बघण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा सिंहाचा वाटा होता. अनास्था, अज्ञान आणि अंधश्रद्धा विरुद्ध छत्रपती शाहू महाराज लढले.
6 मे 2000 22 रोजी त्यांच्या निर्वाणाला बरोबर शंभर वर्ष होतात. यादिवशी शासकीय पातळीवर व सर्व समाजातून सकाळी दहा वाजता शंभर सेकंद उभे राहून या महान व्यक्तिमत्वाला साऱ्या महाराष्ट्राने अभिवादन केले. राजश्री छत्रपती शाहू राजे यांच्या स्मृती शताब्दीला साप्ताहिक गहिनीनाथ समाचारचे विनम्र अभिवादन.
Your posts always provide me with a new perspective and encourage me to look at things differently Thank you for broadening my horizons