कागल, प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर होऊनही बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कागल पंचायत समितीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘एक दिवस घरकुलासाठी 2.0’ या नावाने, प्रशासक तथा गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या संकल्पनेतून, गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आला. या अंतर्गत, तब्बल ४,११२ लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

कागल तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत एकूण ७,८१२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळूनही अनेकांनी अद्याप बांधकामाला सुरुवात केलेली नाही. या पार्श्वभूमीवर, लाभार्थ्यांना बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्या अडचणी व शंकांचे निरसन करून मार्गदर्शन करणे आणि बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती आणि इतर संलग्न विभागांतील एकूण ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘पालक अधिकारी’ म्हणून सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक यांच्यासह विविध विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचे समुपदेशन केले.

यावेळी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. “एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. या उपक्रमामुळे घरकुल पूर्ण करण्याच्या प्रमाणात निश्चितच वाढ होईल,” असा विश्वास प्रशासक तथा गटविकास अधिकारी, श्री. कुलदीप बोंगे यांनी व्यक्त केला आहे.