मुरगुडात माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुचक वक्तव्य
मुरगूड ( शशी दरेकर ) – संभाव्य उमेदवारांच्या बदलत्या भूमिकेमुळे कागल विधानसभा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त करुन महायुतीचा उमेदवार निवडून यावा हीच समन्वयकाची जबाबदारी म्हणून माझी आज भूमिका आहे. असे सुचक वक्तव्य माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले.
मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील तर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे व बिद्री कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
मंडलिक म्हणाले, २०१९ आणि या लोकसभेच्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगे यांनी मला पाठबळ दिले. सद्यस्थितीत तरी समरजितसिह घाटगे यांच्या विरोधात जाण्यासारखे काही नाही. महायुतीत आधी काय ठरतंय ते बघतो. असेही विधान प्रा. मंडलिक यांनी केले.
काही वृत्तपत्रातून कागल विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होती. या पार्श्वभूमीवर खासदार मंडलिक यांच्या वक्तव्यातून अनेक अर्थ ध्वनीत होत आहेत.
माजी खासदार मंडलिक म्हणाले, आपल्या विधानसभेच्या उमेदवारीची घोषणा करणाऱ्यांनी निवडणुकीला न उभारण्याचेही म्हटले आहे. समरजीतसिंह घाटगे उभारणार की नाही हे त्यांनीच सांगायचे आहे. माझा काही विषयच नाही.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, २५ वर्षानी कागलला विकासाच्या मुद्यावर घेवुन पुढे जायचे आहे. कागलचा कोंढाणा जिंकण्यासाठी सर्वानी एकजूट करावी. सत्ता नसताना कोट्यावधींची विकासकामे गेल्या आठ वर्षात केली आहेत. आमदारकीची संधी दिल्यास पाच वर्षात विकास कसा करायचा असतो ते दाखवून देतो. कागलच्या विकासाचे व्हिजन साध्य करण्यासाठी येत्या विधानसभेला उभारणार आणि १००% जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रणजितसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, संकेत भोसले, विशाल भोपळे, पांडूरंग कुडवे यांनी मनोगते व्यक्त केली. शिवराज हायस्कूल, मुरगुड विद्यालय, जीवन शिक्षण, शिवाजी विद्यामंदिर व कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तर ज्येष्ठांनाही साहित्य वाटप करण्यात आले.
नामदेवराव मेंडके, शिवाजीराव चौगले, अनंत फर्नांडिस, दत्तामामा खराडे, विजय राजिगरे, प्रवीण चौगले, अमर चौगले, जीवन साळोखे, किरण गवाणकर, सुहास खराडे, निवृती रावण , एन. के. पाटील, सदाशिव गोधडे,अशोक खंडागळे यांच्यासह कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत राजू चव्हाण, प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, सुत्रसंचालन एम. बी. टिपुगडे यांनी केले. तरआभार निशांत जाधव यांनी मानले.