बातमी

आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन

आरोग्य ही मनुष्याची एक मुलभूत गरज आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण नैसर्गिक सौंदर्य व आरोग्य याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. त्यामुळेच कुटुंबाचे आरोग्य ढासळून मानसिक व शारिरीक आरोग्य धोक्यात येते. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींचा सर्वात मोठा वाटा असतो.

आपण 28 मे “आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन” साजरा करत आहोत. प्रत्येक कुटुंबात स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करुन योग्य वागणूक दिली तर त्यांना आरोग्यदायी जीवन जगता येईल. पर्यायाने कौटुंबिक आणि सामाजिक विकासात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभेल.

महिलांचे लैंगिक आरोग्य आणि प्रजोत्पादन विषयक अधिकार याविषयीची चळवळ जगभरात चालविली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या आणि विकास विषयक प्रत्यक्ष कृती परिषदेने २०३० पर्यंत जगातील सर्व प्रशासनांना स्त्री-पुरुष समानता आणि महिला सबलीकरणाच्या मुद्याला आग्रक्रम देण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींना समान वागणूक, आदर संरक्षण, त्यांचे लैंगिक व प्रजोत्पादन संबंधीचे हक्क आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करण्याबाबत जगात चळवळ सुरु झाली आहे.

महिलांचे आरोग्य अतिशय महत्वाचे असून उत्तम आरोग्याशिवाय व्यक्ती विकास शक्य नाही. आरोग्य या संसाधनात उपचारात्मक, प्रतिबंधात्मक व संवर्धनात्मक सेवांची उपलब्धता व उपयोग यांचा समावेश होतो. बहुधा सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात ही सुविधा उपलब्ध असूनही या सेवेचा लाभ घेतला जात नाही.

आहार हे सुध्दा अतिशय महत्वाचे संसाधन आहे. मात्र आहाराविषयी समाजात बऱ्याच गैरसमजुती असल्याचे दिसून येते. किशोरवयात मुलींची शारिरीक आणि मानसिक वाढ होत असते. यामुळे या वयात प्रथिने, विविध जीवनसत्वे, कार्बोदकेयुक्त सकस आणि पुरेसा आहार असणे आवश्यक आहे. तसेच गर्भवती आणि स्तनदा मातांना त्यांचे स्वतःचे आणि बाळाचे पोषण करणे आवश्यक असते.

परंतु, सामाजिक गैरसमजुती आणि अन्नपदार्थांची पुरेशी उपलब्धता नसणे यामुळे मुली आणि महिलांमध्ये ५० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण असल्याचे दिसून येते. यामुळे किशोरवयीन मुली आणि मातांचे योग्य पोषण होत नाही. भविष्यात जन्माला येणाऱ्या मुलांवर देखील याचा विपरीत परिणाम होवून त्यांना कुपोषण, रक्तक्षय यासारख्या आजारांना बळी पडावे लागते. परिणामी बौध्दिक आणि शारीरिक वाढ कमी होते आणि देशाच्या विकासाच्या निर्देशांकावर याचा विपरित परिणाम होतो.

मासिक पाळीच्या दरम्यान कित्येक स्त्रियांना अति किंवा कमी रक्तस्त्राव आणि अशक्तपणा इ. बाबींचा त्रास होतो. याच कारणास्तव स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण जास्त असते. पुरुषाला लैंगिक आजार असल्यास स्त्रीला जंतूसंसर्गाची शक्यता वाढते. जंतूसंसर्ग झाला तर उशिरा निदान, अपूरा उपचार यामुळे कर्करोग मूत्रसंस्थेचे विविध विकार उद्भवतात.

बाळाची ३ ते ५ वर्षापर्यत योग्य वाढ आणि विकास व्हावा आणि मातेची पहिल्या प्रसुतीची झीज भरुन काढण्यासाठी दोन मुलांमध्ये किमान तीन वर्षाचे अंतर असावे. एक किंवा दोन अपत्यानंतर ( दोन मुली असल्या तरीही) कुटूंब शस्त्रक्रिया केली पाहिजे, यामुळे बाळाला आणि मातेला आरोग्यदायी जीवन जगता येईल.

रजोनिवृतीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास १५ ते ४९ वर्षाचा काळ म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात हा प्रजनन काळ असतो. साधारणतः ४० ते ४९ या वयोगटातील स्त्री संप्रेरकांच्या उणीवेमुळे पाळी अनियमित होऊन कमी होते व नेहमीकरिता थांबते. या दरम्यान स्त्रीची प्रजनन क्षमता नाहीशी होते. या काळात संप्रेरकाच्या न्युनतेचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. सौंदर्य कमी होते, विविध बदल दिसून येतात. या सोबतच या वयात जननेंद्रियांचे कर्करोगसुध्दा दिसून येतात. आजाराव्यतिरिक्त मानसिक आणि सामाजिक असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

ज्या समाजात स्त्री सक्षमीकरणाच्या योजना योग्य प्रकारे राबविल्या जातात तेथे महिलांचे आरोग्य उत्तम प्रतिचे असते, म्हणून महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणं गरजेचे आहे. त्यासाठी महिलांचे मेळावे घेऊन त्यांच्या आरोग्य समस्यांवर चर्चा घडवून आणने गरजेचे आहे. महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करुन मोफत तपासणी व उपचार करणे व आदर्श माता स्पर्धा ठेऊन विजेत्यांचा सत्कार करणे गरजेचे आहे.

स्वयंपाक करताना लोखंडी कढई, तवा, उलतन वापरल्यास रोज ४ ग्रॅम लोह शरीराला मिळते. याचाही शरीराला खूप फायदा होतो. डायट फुडपेक्षा नाचणीची आंबील, उकड खाल्यास त्याचाही हिमोग्लोबीन वाढण्यास फायदा होतो. आपले आरोग्य चांगले रहावे असे वाटत असल्यास हे साधे सोपे घरगुती उपाय करावेत.

दुपारची झोप टाळायला हवी. थोडे चालणे-फिरणे आवश्यक आहे. कायमस्वरुपी आनंदी रहायला पाहिजे. कुटुंबाला जपता-जपता स्वत:कडे दुर्लक्ष करायला नको. घरी व ऑफिसमध्ये वाहवा मिळवण्याच्या बदल्यात स्वत:च्या आरोग्यावर येणा-या ताणाकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी प्रथम प्राधान्याने स्वत:च्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. आपल्या घरात महिला आरोग्यदायी जीवन जगत असतील तर ते कुटुंबही आरोग्यदायी रहात

-प्राचार्य (आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *