मुरगूड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येथे नुकतेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी द्वारे राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत महाविद्यालयात ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, असोसिएट डीटीपी, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह व क्लाऊड एप्लीकेशन डेव्हलपर असे चार कोर्स सुरू करण्यात आलेले आहेत.
महाविद्यालयीन युवकांना पारंपारिक शिक्षणासोबत कौशल्य शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याप्रसंगी जय शिवराय शिक्षण सोसायटीचे कार्याध्यक्ष वीरेंद्र मंडलीक उपस्थित होते. त्यांनी या कोर्सेसच्या निमित्ताने जय शिवराय एज्युकेशन सोसायटीने कौशल्य शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व स्वतःला कौशल्यपूर्ण बनवून रोजगारक्षम बनवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ उदय शिंदे यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव होडगे यांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे कार्यवाह अण्णासाहेब थोरवत, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नोडल ऑफिसर भरत शिंदे, मुरगुड नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी स्नेहल पाटील सूर्यवंशी, सर्व पत्रकार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी आभार डॉ कोळी यांनी मानले.