मुरगूड ( शशी दरेकर ) – वेगाने बदलणाऱ्या जागतीक परिस्थितीमध्ये बहुविद्याशाखीय कौशल्ययुक्त युवापिढी निर्माण होण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ पी एस पाटील यांनी बीजभाषक म्हणून बोलतांना व्यक्त केले. येथील सदाशिवराव मंडलिक महाविदयालयात एक दिवशीय बहुविद्याशाखीय राष्ट्रिय
परिषद आयोजित केली होती यावेळी ” अभ्यासक्रमाव्दारे कौशल्यवृद्धी एक बहुविद्याशाखीय दृष्टिकोन ” या विषयावर ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार होते . शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ टी एम चौगले , शिवराज एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आण्णासाहेब थोरवत , दूधसाखर महाविद्यालय बिद्रीचे प्राचार्य डॉ संजय पाटील , देवचंद कॉलेज अर्जुननगर च्या प्राचार्या इंगळे मॅडम प्रमुख उपस्थित होते .
डॉ पाटील म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याचा विचार , पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण , असा साकल्याने करणेची गरज आहे . नविन शैक्षाणिक धोरण अम्मलबजावणी पातळीवर आल्याने सर्वांनी त्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. जागतिक स्थरावर वेगाने घडणारे बदल आणि घडामोडी लक्षात घेता आजच्या युवकाने केवळ माहिती आणि ज्ञान घेऊन चालणार नाही तर अनुभवजन्य कौशल्याची गरज आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी त्याला बहुविद्याशाखीय ज्ञान अनुभव व कौशल्य प्राप्त होणे गरजेचे आहे . म्हणून नविण शैक्षाणिक धोरण अंतर्भुत असलेल्या बहुविद्याशाखीय कौशल्य वृद्धी होण्याच्या दृष्टिने उच्च शिक्षण संस्थामध्ये काम होण्याची गरज आहे .
प्रमुख पाहुणे व मंडलिक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ जयंत कळके यांनी मनोगत व्यक्त केले . ते म्हणाले , नविण शैक्षाणिक धोरणाची अम्मलबजावणी ही आवाहनात्मक बाब आहे. यामध्ये प्राध्यापक हा महत्वाचा घटक आहे . नविण शैक्षाणिक धोरण यशस्वी करण्यासाठी त्यांनी समजून घेऊन अभ्यासपूर्ण अम्मल बजावणी करण्याची आवश्यकता आहे .
प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार यांचे यावेळी अध्यक्षीय भाषण झाले . ते म्हणाले, मंडलिक महाविद्यालयाने आयोजित केलेली बहुविद्याशाखीय परिषद वैशिष्ट्यपूर्ण असून जून २०२५ मध्ये अम्मलबजावणी होत असलेल्या नविन शैक्षणिक धोरणासाठी दिशादर्शक आहे . परिषदेला प्राप्त झालेल्या प्रचंड प्रतिसादातून आणि शोध निबंधातून अनेक नविन उपयुक्त संकल्पना आणि सूचना या येत्या काळात विद्यार्थ्यांच्या नव्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे . दरम्यान या परिषदेत सादर करण्यात आलेले शोध निबंध इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ एज्युकेशन , पुणे या प्रथितयश शिक्षण संस्थेच्या “‘ शिक्षण आणि समाज ” या जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची जबाबदारी संस्थेचे सचिव प्रा .डॉ जयंत कळके यांनी घेतल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रायार्च डॉ कुंभार यांनी कृतज्ञता व्यक्त केली . तसेच परिषद यशस्वी करण्यासाठी कृतियुक्त योगदान दिलेल्या सर्व घटकांचे कौतुक केले .
प्रारंभी परिषदेच्या संयोजक प्राध्यापिका डॉ सौ माणिक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . प्रा डॉ उदय शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . प्रा डॉ शिवाजी होडगे यांनी आभार मानले.