कागल/ प्रतिनिधी : कागल सह परिसरात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले .गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात पाच दिवसाच्या बाप्पास निरोप दिला. कागल नगरपालिकेने याहीवर्षी मूर्ती, निर्माल्य दान उपक्रम राबवला 625 मुर्त्या पालिकेकडे दान केल्या. तर दोन टन निर्माल्य संकलीत झाले. गेल्या पाच दिवसापूर्वी आलेल्या गणपती बाप्पा मुळे संपूर्ण कुटुंबे भक्तिरसात न्हाऊन गेली. बाप्पांची आरास, गोड_धोड नैवद्य, पूजा-अर्चा, आरती करण्यात सर्वचजण रंगून गेले.परिवारामध्ये एक वेगळा आनंद निर्माण झाला होता. गणेश उत्सवात मग्न होऊन मोठ्या भक्तिभावाने पूजन करीत संकटनाशक बाप्पांना आज निरोप देण्यात आला.
प्रतिवर्षाप्रमाणे कागल नगरपालिकेने याहीवर्षी “मूर्तीदान निर्माल्य दान” हा उपक्रम राबवला त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. जयसिंगराव पार्क पाझर तलाव याठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी मनाई करण्यात आली होती. कागल शहरात दहा प्रभागांमध्ये 12 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. शहरात सुमारे 475 मुर्त्या भक्तांनी दान केल्या. तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाने कागल नदीकाठी कर्मचाऱ्यांची मोठी फौज ठेवली होती. या ठिकाणी 175 मुर्त्या भक्तांनी दान केल्या. निर्माल्य दान उपक्रमास नागरिकांच्या कडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला सुमारे दोन टन निर्माल्य गोळा झाले. कागल नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह कर्मचारी या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. तालुक्याच्या खेड्यापाड्यातून ही ग्रामपंचायत स्तरावर मूर्तीदान निर्माल्य दान उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.