कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे
कौलगे, दि. १९ : कागल तालुक्यात जातीयवाद वाढू नये यासाठी मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे एकत्रित काम करू, असे प्रतिपादन खासदार संजयदादा मंडलिक यांनी केले. कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे आहे, असा समजदारीचा सल्लाही त्यांनी समरजित घाटगे यांचे नाव न घेता दिला.
कौलगे ता. कागल येथील युवा कार्यकर्ते नंदू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार श्री. मंडलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा हे नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खासदार संजय दादा मंडलिक म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून माझ्यासह मुश्रीफसाहेब व संजयबाबा आम्ही तिघेही एकत्रच काम करीत आहोत. परंतु; मधल्या काळात काम करत- करत मुश्रीफसाहेब आणि संजयबाबा मला जरा विसरले होते. हिंदुत्वाचा मुद्द्यासह सीबीआय, इन्कम टॅक्स या माध्यमातून या देशांमध्ये एक प्रकारची अघोषित आणीबाणीच सुरू आहे. यापद्धतीने नेत्यांना नामोहरम करून सत्ता हस्तगत करण्याची कटकारस्थाने रचली जात आहेत.
माझाही वाढदिवस तिथीप्रमाणे गुढीपाडव्यादिवशी असतो असे म्हणत खासदार श्री. मंडलिक यांनी या विषयाला सुरुवात केली. आता रामनवमी म्हटले की मुश्रीफसाहेबांचा वाढदिवस, गुढीपाडवा म्हटले की माझा वाढदिवस असे अनेक वर्षे चालत आले आहे. आता तिथीच्या वादात पडायला नको म्हणून मी तारखे प्रमाणे वाढदिवस करायचा ठरवल आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, भारतीय जनता पक्षाने समाजा- समाजामध्ये दुही पसरवुन कशाप्रकारे राज्य हस्तगत करता येईल, हा एकमेव अजेंडा ठेवला आहे. कोल्हापूर जिल्हा ही छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची स्वाभीमानी भूमी आहे. वास्तविक; महाविकास आघाडी म्हणून मी, खासदार मंडलिक व माजी आमदार श्री. घाटगे आम्ही एकत्रच आहोत. केडीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने थोडसं वेगळे चित्र निर्माण झालं होतं. कारण; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे त्यांना झुकावं लागलं व वेगळे पॅनेल तयार करावं लागलं. त्यामुळे थोडे मतभेद जरी झाले असले तरी माझ्या नेत्याचा मुलगा आणि छोटा गुरुबंधू असल्यामुळे काहीही झालं तरी आम्ही तिघेही नेतेमंडळी एकत्रच आहोत. यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही.
आठवड्यापूर्वी रामनवमीला माझा जन्म वाढदिवस झाला, असे म्हणत मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आता त्या वाढदिवसाचे संशोधन सुरू आहे. एखाद्या माणसाने कुठल्या दिवशी जन्मावं आणि तो दिवस नसावा, याविषयी संशोधन व्हावं हा दुर्दैवी प्रसंग आहे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले,
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे रामनवमीला जन्मले आहेत. आता मी त्यादिवशी जन्मलो नाही त्याला काय करूया? असा उपरोधिक टोलाही त्यांनी समरजित घाटगे यांचे नाव न घेता लगावला. आता मलाही श्रीकृष्ण जयंतीला, शिवजयंती रोजीच जन्मायला पाहिजे होतो, असे वाटते. परंतु जन्माला यायला नको काय? निसर्गाचे काही नियम आहेत की, असेही ते म्हणाले.
“हा नवाच प्रकार………”
खासदार श्री मंडलिक म्हणाले, या देशात आपण रामजन्मभूमीचा वाद बघितला. परंतु; रामनवमी दिवशी जन्माला आला का नाही, हा वेगळाच वाद कागल तालुक्यातील मंडळी करीत आहेत. खरं म्हटलं तर कोण कधी जन्माला आला यापेक्षा काम काय केलं? याचं मूल्यमापन होणे गरजेचे आहे. कागल तालुक्यात पुढच्या काळात जातीयवादी विचार वाढू नयेत, यासाठी आम्ही तिघी यापुढे प्रयत्न करू.
“मुश्रीफ आमचे दादा…….”
संजयबाबा घाटगे म्हणाले, यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ हे माझ्यापेक्षा लहान आहेत असे समजायचो. परंतु या सगळ्या वादात एक गोष्ट स्पष्ट झाली की एक महिन्याने का असेना ते आमच्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे मोठा भाऊ म्हणून त्यांचा आदर अधिकच वृद्धिंगत होईल. कारण ते आमचे दादा आहेत.