शहरास अव्यवस्थेचा विळखा, आठवडी बाजाराचे अनियोजन
कागल : ‘सर्वांग सुंदर स्वच्छ कागल शहर’ या घोषवाक्याचे सुरुवात झालेल्या मोहीमेच्या दुसर्या बाजूला मात्र शहरात अव्यवस्थेने विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे.
काही गल्ल्यांमध्ये आणि बाजारपेठेतील रस्त्यांवर दुकानदार व स्थानिक लोकांनी आपल्या स्वतःच्या मर्जीने बेकायदेशीर स्पीडब्रेकर (गतिरोधक) चे बांधकाम केल्याने वाहनांना छोटे-मोठे अपघात होत आहेत.
तसेच सार्वजनिक मुतारींची दुरावस्था, मोडतोड, आठवडी बाजाराचे अनियोजन, पानपट्ट्यांवर खुलेआम विकला जाणारा मावा, फुटपाथ वरील अतिक्रमण यामुळे शहरास अव्यवस्थेचा विळखा बसल्याचे चित्र दिसत आहे.
कागल शहरातील काही गल्ल्यांमध्ये व बाजारपेठेतील काही रस्ते, रिंग रोड, जयसिंग पार्क येशिला पार्क इत्यादी ठिकाणी काही स्थानिक नागरिकांनी व दुकानदारांनी आपल्या घरासमोर आणि दुकानांसमोर खाजगी गतिरोधक बांधून घेतले आहेत. यासाठी त्यांनी पालिकेची परवानगी घेतलेली नाही. या खाजगी स्पीडब्रेकरमुळे दुचाकी गाड्या वरून पडणे, चारचाकी गाड्यांची बंपर घासणे, किरकोळ अपघात यासारख्या घटना घडत आहेत.
मुळात रस्त्यांवर स्पीडब्रेकर बांधण्याची जबाबदारी राज्याच्या रस्ते विकास प्राधिकरण व शहराच्या नगरपालिकेची असते. हे गतिरोधक किती उंचीची व रुंदीचे असावेत याबाबतीत काही नियम आहेत. पण हे खाजगी गतिरोधक बांधताना नियम धाब्यावर बसवून अवास्तव उंचीचे बांधले जातात. तसेच या खाजगी गतीरोधाकांवर पांढरे पट्टे नसल्याने ते लांबून दिसत नाहीत. यामुळे गाड्यांना अपघात होत आहेत.
सार्वजनिक मुतारींची दुरावस्था
शहरातील सार्वजनिक मुतार्यांची अवस्था वाईट आहे. मुतारीमध्ये कमालीची अस्वच्छता आहे. काही महाभाग मुतारीचा वापर संडास सारखा करत असतात. मुतारीमध्ये दगड, विटांचे तुकडे, दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. शहरातील काही ठिकाणच्या मुतार्या गायब झाल्या आहेत.
मध्यंतरी मुतारी पाडून त्या ठिकाणी पानपट्ट्या व दुकाने बांधण्याचे फॅड पसरले होते. याला वेळीच आळा घालावा अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच महिलांसाठी वेगळ्या मुतारी बांधाव्यात अशी मागणी होत आहे. विशेषता आठवडी बाजारवेळी महिलांना कुचंबणेचा सामना करावा लागतो.
माव्याची खुलेआम विक्री
शहरातील काही पानपट्ट्यांवर अवैधरित्या खुलेआम मावा विक्री केली जात आहे. याची माहिती संबंधित खात्याला असूनही त्यावर ‘तेरी भी चूप मेरी भी चुप’ असा प्रकार सुरू असतो. शाळा व कॉलेजची तरुण मुले माव्याच्या आहारी गेल्याचे सर्वत्र दिसत असतानाही यावर कारवाई का होत नाही अशी नागरिकांची विचारणा होत आहे.
कोरोना साथीच्या अगोदरच्या काळात कागल नगरपालिकेने सोमवार व गुरुवारच्या आठवडी बाजाराचे नीटनेटके नियोजन केले होते. आठवडी बाजार हा गैबी चौकापासून आलासकर फायरवर्क्स पर्यंत भरवला जात असे.
यामुळे मुख्य बाजारपेठेतील गर्दी कमी झाली होती व नागरिकांनाही खरेदी करणे सोयीचे झाले होते. पण सध्या पुन्हा मुख्य बाजारपेठेत आठवडी बाजार भरत असून यामुळे गर्दी वाढली आहे व बाजारा नंतर स्वच्छतेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
मुख्य बाजारपेठ व सांगाव रिंग रोड या मार्गावर असणारे फुटपाथ अतिक्रमणने जणू गायबच झाले आहेत. फुटपाथ नागरिकांसाठी नसून जणू दुकानदारांना सामान ठेवण्यासाठी, खडी, वाळू, सिमेंट, सळ्या टाकण्यासाठी, लोकांना त्यावर घरगुती बांधकाम करण्यासाठीच आहेत का असा प्रश्न पडतो. विशेषता रिंग रोड मार्गावरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहे याकडे पालिकेने लक्ष द्यावे. कागल शहरात विविध रस्त्यांवर पाळीव जनावरे मोकाट फिरत असून यामुळे वाहतुकीची कोंडी, किरकोळ अपघात होणे यासारख्या घटना घडत आहेत. या मोकाट जनावरांचे मालक गायब असून ही जनावरे कचराकुंड्या विस्कटणे, त्यातील प्लास्टिक पिशव्या खाणे, लोकांच्या अंगावर धावून जाणे सारखे उद्योग करत असतात. तरी याकडे नगरपालिका प्रशासनाने गंभीरपणे पाहायला हवे.
कागल शहरातील संभाजी चौक ते ठाकरे चौकापर्यंत सध्या गटारीचे काम सुरु आहे. पण हे काम करताना बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकलेले असते. तसेच अनेक महाभागांनी या मार्गावरील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून हा रहदारीचा अरुंद रस्ता अजूनच अरुंद झाला आहे. तरी पालिकेने कागल बसस्थानक ते संभाजी चौक अतिक्रमण मुक्त करावा अशी नागरिकांतून सतत मागणी होत असते. कागल मध्ये घरकुल मध्ये काहींनी इमारतीखाली घरगुती सामान ठेवण्यासाठी पत्र्यांची पक्की शेड मारून घेतली आहेत. यामुळे तेथून येण्याजाण्यास नागरिकांना त्रास होत आहे. तरी ही अनधिकृत शेड्स नगरपालिकेने काढून टाकावीत.