मुरगूड (शशी दरेकर) -19 व्या शतकामध्ये फुले दाम्पंत्याने मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी शाळांची निर्मिती केली तसेच रात्र शाळा, शिक्षणशाळा सुरू केल्या. अशा 18 शाळांची निर्मिती फुले दाम्पंत्याने केली. महात्मा फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पत्नीला शिकवून पहिल्यांदा साक्षर केले त्यामुळे त्या आद्यशिक्षिका बनल्या. तर मुस्लिम धर्मात शिक्षणाबद्दल अनास्था असताना सुद्धा फातिमा बेग सारख्या मुस्लिम महिलेने शिक्षणशाळा पुर्ण केली व ती मुस्लिम धर्मातील पहिला स्त्री शिक्षिका बनली ही बाब अलौकीक आहे.
धर्मग्रथांनुसार स्त्रीयांनी शिकणं ही विसंगती असताना सुद्धा सावित्रीबाई फुले व फातिमा बेग या भिन्न धर्मिय स्त्रीयांनी एकत्रित शैक्षणिक चळवळ चालू केली.यावरून हिंदु-मुस्लिम हे भारतीय परंपरेचे महत्वाचे खांब असल्याचे अधोरेखित होते असं प्रतिपादन प्रा.डाॅ.भारती पाटील यांनी व्यक्त केले.त्या समाजवादी प्रबोधिनी आयोजित डॉ.आंबेडकर व्याख्यानमालेत बोलत होत्या.
मुरगुड ता.कागल येथे समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रा. डाॅ. भारती पाटील यांनी निमंत्रित केले होते. त्यांनी ‘सावित्रीबाई फुले व फातिमा बेग यांचे सामाजिक कार्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या दरम्यान साई अॅकॅडमीचे कुस्ती कोच दादासो लवटे व महिला पैलवान यांचा कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेबद्दल यथोचित सत्कार केला.अध्यक्षस्थानी मुरगुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप घार्गे होते.स्वागत प्रबोधिनीचे सचिव समिर कटके तर प्रास्ताविक डी.डी.चौगले यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ.पाटील पुढे म्हणाल्या,जातीची उतरंड ही ब्राह्मणांची कसब आहे.जन्माचा,मृत्युचा,विवाहाचा विधी करणं ब्राह्मणाने स्वतःच्या पोटापाण्याचा व्यवसाय बनविला आहे म्हणून परमेश्वर व माणुस यात कोणतीही मध्यस्थी नको यासाठीच फुलेंनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली आहे.मानवी जीवन उंचावण्यासाठी विवेकी दृष्टीकोन ठेवून बुद्धीप्रामाण्यवादी बनण्याची गरज आहे.
यावेळी दलितमित्र एकनाथराव देशमुख,विद्यागौरी हावळ,सारीका पाटील,उज्वला शिंदे,बी.एस.खामकर,देवानंद पाटील,विकास सावंत,सुनिल डेळेकर,रविंद्र शिंदे,जयवंत हावळ,शाहु फर्नांडिस,पांडुरंग पाटील,राम पोवार,शंकर कांबळे इत्यादी मान्यवर व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास सावंत यांनी केले तर आभार प्रबोधिनीचे अध्यक्ष बबन बारदेस्कर यांनी केले.