महाराजांच्या पाद्यपूजेचा लाभ
आडी (ता. निपाणी) : येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीदत्त मंदिरामध्ये श्री दत्तगुरूंचे तसेच सद्गुरू परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांनी पहाटेपासूनच रांग लावली होती.
यावेळी सकाळी श्री दत्तगुरुंचरणी परमपूज्य परमात्मराज महाराज व श्री देवीदास महाराज यांच्या हस्ते अभिषेक अर्पण करून पूजाअर्चा करण्यात आली. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

त्यानंतर सद्गुरू परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी ‘जय परेश सर्वायण’ या वैश्विक मंत्राचा जप करण्यात आला. अनेक भाविकांनी पुष्पहार, श्रीफळ, पेढे अर्पण करून परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या पाद्यपूजनाचा व दर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी श्री देवीदास महाराज, श्री राम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री अमोल महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री समाधान महाराज, श्रीधर महाराज, मारुती महाराज आदी आश्रमस्थ साधूंच्या हस्ते परमपूज्य परमात्मराज महाराजांची पाद्यपूजा करण्यात आली.
अविनाश जोशी व दिगंबर जोशी यांच्या कडून षोडशोपचार पूजा, स्तोत्रपठण, इत्यादीद्वारे पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी आडी, बेनाडी, कोगनोळी, म्हाकवे, हंचिनाळ, निपाणी, कागल, कोल्हापूर, गडहिंग्लज, पुणे, मुंबई, बेळगाव, सांगली, सातारा, मालवण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, छ. संभाजीनगर, गोवा या परिसरांतील असंख्य भाविकांनी पारमार्थिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.