सर्वच साखर कारखान्यांच्या साखरविक्री तपासणीसाठी त्यांनी कोणत्याही कारखान्यात यावे
साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड साखर कारखाने दाखवतील
कोल्हापूर, दि. ८: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे संपूर्ण अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देत आहोत, असे प्रत्युत्तर वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. सर्वच साखर कारखान्यांच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी त्यांनी कोणत्याही कारखान्यात यावे. सर्व साखर कारखाने त्यांना साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवतील. त्यामुळे श्री. शेट्टी यांचा साखरविक्रीच्या दराबाबतचा संभ्रम आणि गैरसमज दूर होईल, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे.
श्री. शेट्टी यांनी स्वतः माझे नाव घेतल्यामुळे हे पत्रक मी काढलेले आहे. यापुढे मी त्यांना उत्तरही देणार नाही, असेही या पत्रकात म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हटले, कर्नाटक राज्यामध्ये गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे साखरदर साधारणत: ५० रुपयांनी उतरलेले आहेत. लवकरच म्हणजे १५ नोव्हेंबरला केंद्र सरकारचा साखर विक्रीचा कोटा येणार आहे. या कोट्याची साखरही माजी खासदार राजू शेट्टीच विक्री करतील. यावर्षीचा गाळप हंगाम फार कमी आहे. संपूर्ण देशभरात साखरेची मोठी टंचाई आहे. त्यामुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता असूनसुद्धा केंद्र सरकार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
पत्रकात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही साखर कारखान्याने जर प्रतिटनाला ३,५०० रूपये ऊसदर दिला असेल तर तो माजी खासदार श्री शेट्टी यांनी दाखवून द्यावा. आजघडीला कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागातून जवळच असलेल्या कर्नाटक राज्यामधील साखर कारखान्यांकडे प्रतीटनाला २,८०० ते २,९०० दराने ऊस चालला आहे. ही सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. साखर विक्रीमध्ये सभासदांच्या साखरेचा अंतर्भाव आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यात जो वाढलेला दर आहे तो सरासरीने कमी दिसतो. याचीही शहानिशा श्री. शेट्टी यांनी करावी.
दरम्यान; श्री. शेट्टी यांना यापूर्वीही आम्ही आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये साखर विक्रीबाबतची पडताळणी करण्यासाठी त्यांनी तज्ञ चार्टर्ड अकाउंटंटचे पथक पाठवावे आणि हवी ती माहिती घ्यावी. अद्यापही साखर विक्रीच्या दराबाबत त्यांच्या मनामध्ये शंका असतील तर अजूनही त्यांनी तज्ञ चार्टर्ड अकाउंटंटचे पथक कारखान्यांमध्ये पाठवून साखर विक्रीचे रेकॉर्ड तपासावे.
पुण्याच्या साखर कारखान्यांनी जो वाढीव दर दिलेला आहे याबद्दल सर्व कारखान्यांनी खुलासा केला आहे की तिथे एफआरपी तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. त्यामुळे व्याजामध्ये बचत होते. त्यांचा गळीत हंगाम जास्त दिवस चालत असल्यामुळे साहजिकच साखर, बगॅस आणि मोलॅशीस यांचेही उत्पादन वाढते. त्यांना त्याचा फायदा होतो. साहजिकच त्यांनी ऊसाला दिलेला शंभर ते दीडशे रुपये जादा दर हा त्याचाच परिणाम आणि परिपाक आहे.
खाजगी साखर कारखाने वगळता सहकारातील साखर कारखाने सभासद आणि शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. कुठल्याही चेअरमन आणि संचालक मंडळाच्या मालकीचे हे कारखाने नाहीत. म्हणूनच त्यांना साखर कारखानदार म्हणून हिणवणे योग्य दिसत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, याची जाणीव आम्हाला आहे.
साखरेचे दर वाढले तरच शेतकऱ्यांना चांगला परतावा देता येईल. शेतकरी संघटनेमुळेच साखरेला आणि पर्यायाने उसाला चांगला दर मिळण्यात मदत झाली, हे आम्ही कधीच नाकबूल केलेले नाही. एकतर गाळप हंगाम कमी असल्यामुळे नऊ महिने बसून पगार द्यावा लागत आहे. तशातच, साखर कारखान्यांची कर्जे एवढी वाढलेली आहेत की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन म्हणून मला झोपसुद्धा लागत नाही. असे असताना हे आंदोलन योग्य नाही. त्यांना पुन्हा माझी कळकळीची विनंती आहे की, हे आंदोलन थांबवावं आणि कारखान्यांची परिस्थिती त्यांनी बघावी.
It’s truly a great and useful piece of info.
I am happy that you shared this useful information with us.
Please keep us up to date like this. Thank you for sharing.