कागल : माल एकाचा आणि बिल दुसऱ्याचे अशी बोगस बिले सादर केल्याच्या संशयावरून बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोन प्रतिष्ठित कंपन्यांवर कोल्हापूर येथील जीएसटीच्या पथकाकडून छापे टाकले.
या मोठ्या कंपन्यांची चौकशी अद्याप सुरू आहे. बनावट व्यापाऱ्यांकडून बनावट बिले सादर करून काही व्यवहार झाले आहेत का या दोन मुद्यांवर कोल्हापूर येथील जीएसटी पथकाकडून स्थानिक पातळीवरील या कंपन्यांची दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे.
कर न भरताही काही कंपन्या त्यांच्याकडील माल निर्यात करत असल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात येत आहेत. याद्वारे काही निर्यातदारांनी रोख रकमेद्वारे करांचे कोणतेही पैसे भरले नसल्याचेही स्पष्ट होण्याचीही शक्यता आहे. मात्र याची पडताळणी अद्याप सुरू असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दोन कंपन्या मोठ्या असल्यामुळे जीएसटी विभागाकडून बारा कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केलेले आहे, अशी माहिती चौकशी अधिकाऱ्यांनी दिली. जीएसटी भवनात ही कागदपत्रे आणून त्याची पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.