मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड येथील मुरगुड शहर पत्रकार संघटनेच्या वतीने यावर्षी ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि संवाद या कार्यक्रमातून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र शिंदे होते.
१९७० – ८० च्या दशकात प्रिंट मीडियामध्ये काम करणाऱ्या जीवन साळोखे, चंद्रकांत माळवदे आणि व्ही. आर. भोसले या ज्येष्ठ पत्रकारांनी नव्या पिढीतील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, आणि वेब मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या – जुन्या पत्रकारांना अनेक मौलिक सल्ले दिले.

आजच्या पत्रकारीतेतील आव्हानांना सामोरे जाताना बातमीतील सत्यता, वास्तव परिस्थिती, अस्तित्वासाठीची धडपड, दैनिकांमधील स्पर्धा, जाहिराती मिळवण्याचे आव्हान या विषयी जीवन साळोखे, चंद्रकांत माळवदे आणि व्ही. आर. भोसले यांनी मते मांडली. वाचनाचा व्यासंग वाढवून लोकसंपर्काच्या माध्यमातून आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
नुतन नगर सेवक सुनिल रणवरे, प्रा. चंद्रकांत जाधव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. अशोक दरेकर, संदीप सूर्यवंशी, शशिकांत दरेकर, माजी सरपंच देवानंद पाटील (निढोरी), विनायक गाडगीळ, सतिश चौगले, विजय चौगले, राजेंद्र चव्हाण, मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रविंद्र कांबळे व स्टाफ आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत महादेव कानकेकर, प्रास्ताविक प्राचार्य शाम पाटील, सुत्रसंचलन अविनाश चौगले आभार पत्रकार विजय मोरबाळे यांनी केले.
मुरगूड शहर पत्रकार संघाने उभारलेल्या नूतन पत्रकार भवन उभारणीच्या कामाचे कौतुक करून या भवनातील नुकत्याच झालेल्या दिमाखदार सोहळ्याचे यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकारांनी भरभरून कौतुक केले.