संघाचा सुरू असलेला योग्य कारभार जनतेसमोर येईल
कागल / प्रतिनिधी – गोकुळ दूध संघाचे विशेष चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. असे वाचनात आले. हा निर्णय स्वागतार्हरच आहे, यामुळे दूध संघाचा कारभार किती पारदर्शीपणे आहे हे जनतेसमोर येईल, असा विश्वास माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.
कागलच्या विश्रामधाम वर आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते .यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने , गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, नितीन दिंडे, चंद्रकांत गवळी ,प्रवीण काळबर आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
गोकुळ दूध संघाचे लेखापरीक्षण होणार आहे . असे आमदार मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या सोबत गोकुळ दूध संघाच्या सत्तेत सध्या भाजपसोबत असलेले आमदार विनय कोरे, शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर व चंद्रदीप नरके हे आहेत . ही मंडळी सत्तेत असताना देखील दूध संघाचे विशेष चाचणी लेखापरीक्षण होत आहे ,याचेच मला आश्चर्य वाटत आहे.
श्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघात आमची सत्ता येऊन दीड वर्ष झाली आहेत. निवडणुकीत आम्ही दूध दरात दोन रुपये दरवाढ देऊ व पारदर्शी कारभार करू, अशी घोषणा केली होती . मात्र प्रत्यक्षात दीड वर्षात आठ रुपयांची वाढ दूध उत्पादक सभासदांना दिली आहे. म्हणजेच दूध दरात आम्ही चौपट वाढ केली आहे. यापूर्वी उपपदार्थांमध्ये संघाला फायदा मिळत नव्हता तो आता मिळू लागला आहे. सर्व कारभार कायदेशीर पद्धतीने व पारदर्शीपणे सुरू आहे .आमचा यासाठीच कटाक्ष आहे . त्यामुळे संघाचा कारभार योग्य पद्धतीने सुरू आहे. शासनाने लेखापरीक्षणाचा घेतलेला निर्णयाचे आपण स्वागत करतो. या विशेष लेखापरीक्षणामुळे दूध संघाचा कारभार कसा योग्य पद्धतीने सुरू आहे हे जनतेसमोर येईल असेही त्यांनी सांगितले.