कोल्हापूर : कोरोनाच्या संकट काळात या साथीने आपला पती दगावलेल्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्याबरोबरच या महिलांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अनेक महिला उच्च शिक्षित आहेत त्यांना रोजगारस्वयंरोजगार मिळवून पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करा. ही आपत्ती एका महायुद्धानंतर झालेल्या स्थिती समान आहे, त्यामुळे पुढील चार ते पाच वर्षे या कुटुंबांमध्ये विशेष लक्ष द्या, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या.
कोरोना काळात कोल्हापूर जिल्ह्याचे उत्कृष्ट काम, शासकीय अधिकाऱ्यांनी पालकत्व घेण्याबाबत दिल्या सूचना
कोरोना काळातील उपाय योजनाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कोअरीलयात बैठक घेतली. उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, एकल महिलांना पायावर उभे करण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात यावे. शासनाच्या महामंडळांनीही त्यांच्याकडील योजनांचा लाभ अशा महिलांना मिळवून द्यावा. ज्या विधवा पदवीधर आहेत त्यांना प्रशिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी पुढे यावे.
कोरोनामध्ये ज्या शेतकरी महिला विधवा झाल्या आहेत अशा महिलांना कृषि विभागाने बी-बियाणे, खते मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात एक पालक गमावलेली 965 तर दोन्ही पालक गमावलेली 14 मुले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या अनाथ बालकांना प्रमाणपत्र व शासनाचे अनुदान देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या कामाबात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. समाजाने या बालकांना मदत करण्यात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. अनाथ बालकांचे विशेषत: मुलींचे शिक्षण पुढे सुरु रहावे यासाठी या बालकांचे पालकत्व स्वीकारलेल्या पालकांशी संपर्क ठेवावा. बाल विवाह होणार नाहीत, शिक्षण थांबणार नाही, स्थावर मालमत्तेबाबत कोणातही प्रश्न उद्भवणार नाही याबाबत पोलीसांनी दक्ष रहावे, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केल्या.
ज्या रुग्णालयांना शासकीय जमीन दिली आहे तिथे कोणकोणत्या योजना आहेत, किती खाटा आहेत याचे बोर्ड लावले आहेत, याची माहिती द्या. धर्मादाय आयुक्तांकडे ही माहिती असली तरी लोकांना माहिती होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आणि तालुका जिल्हा पातळीवर ही माहिती लोकांना माहितीसाठी द्यावी, स्वयंसेवी संस्थांनी आपल्या माध्यमातून ही माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
कोरोना काळात जिल्हा प्रशासनाचे उत्कृष्ट काम
कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट काम केले असल्याचे सांगून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, रुग्णालयांच्या ऑडिटसाठी ऑडिटर नेमून वैद्यकीय बिलामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा दिला. कोरोना काळात आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच कामगारांना मदत वाटप, कामगारांची नोंदणी यामध्येही जिल्ह्याचे चांगले काम केले असल्याचे त्या म्हणाल्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना मदत वाटप बैठक संपन्न झाली. बैठकीस खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आपत्ती व्यस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, संजय पवार, विजय देवणे उपस्थित होते.