कागल (विक्रांत कोरे) : वनमित्र संस्था, करनूर ( ता. कागल ) यांच्यावतीने शिवजयंती निमित्त किल्ले रत्नदुर्ग, जिल्हा रत्नागिरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किल्ल्यावरती किल्ले स्वच्छता अभियान, शाहिरी कार्यक्रम, पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम स्वच्छता अभियानांतर्गत पार पडले.
यावेळी कागल, निपाणी, करनुर, आडी, कुरली, आप्पाचीवाडी, सांगाव, बामणी, लिंगनुर, कोल्हापूर येथील सुमारे 260 महिला व शिवभक्त उपस्थित होते. रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक थिबा पॅलेस पाहून किल्ल्यावर स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. सदर अभियानायामध्ये किल्ल्यावरील सर्व प्लास्टिक कचरा, रिकामी पाणी बाटल्या, प्लास्टिक पॅकेट व इतर अनावश्यक कचरा गोळा करण्यात आला.
जवळपास 40 पोती कचरा गोळा करण्यात आला. किल्ल्याच्या तटबंदी व बुरजावरील अनावश्यक वाढलेली झाडेझुडपे कटर मशीनच्या साह्याने काढण्यात आली. किल्ल्यावरील नैसर्गिक पाणी निचरा केंद्र जी प्लास्टिक बाटली व प्लास्टिक पिशवी मुळे बंद पडले होते त्यांची साफसफाई करून ती पूर्णता सुरू करण्यात आली. त्यामुळे किल्ल्यावरील पावसाळ्यातील पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा सुरू राहील. किल्ल्यावर ठीकठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी प्लास्टिकच्या कचराकुंड्या बसवण्यात आल्या.
यावेळी, राष्ट्रसेवा दलाचे शाहीर विजय सुवासे, शाहीर अजय सुवासे, शाहीर भाई मयेकर, शाहीर बाबासाहेब नदाफ, शाहीर रफिक पटेल यांचा लोकप्रबोधनात्मक असा शाहीरी कार्यक्रम संपन्न झाला. छ.शिवाजी महाराजांनी परिवर्तन करून स्वराज्य स्थापन केले होते त्यावर आधारित गाणी व थोर समाज सुधारक यांच्या जीवनावर आधारित अनेक गीते सादर करण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, म.जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या सामाजिक कार्यावर आधारित अनेक गीते सादर करण्यात आले. तसेच अनिस शाखा कागल यांच्या सदस्यांनी चमत्कार व विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.
अॅड. उदय मोरे यांनी शिवरायांच्या इतिहासाची माहिती सांगितली. किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्याचा नकाशा व माहिती असलेला मोठा फलक लावण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष अजित पाटील यांच्या पत्नी सौ. अंजनी अजित पाटील यांच्या हस्ते गड पूजन करण्यात आले.
गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या महादेव मंदिरापासून गडावर शिवरायांची पालखी महिलांच्या हस्ते आणण्यात आली. यावेळी प्राध्यापक डॉ. अरुण शिंदे (नाईट कॉलेज, कोल्हापूर) यांच्या व कै.काँ. प्रविण जाधव यांच्या पत्नी श्रीमती गीता जाधव यांच्या हस्ते शिवराज्य मंच आयोजित वीरभूमी दर्शन 2023 किल्ले गगनगड यात्रा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्राध्यापक डॉक्टर शिंदे सर यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्याचे सध्याचे तहसीलदार शशिकांत जाधव होते. यावेळी शिवराज्य मंचचे अध्यक्ष इंद्रजीत घाटगे, सचिन घोरपडे, वनमित्रचे अशोक शिरोळे, डॉ.उदय मोरे, विक्रम चव्हाण, नाना बरकाळे, काशिनाथ गारगोटे, राजेंद्र घोरपडे, अक्षय भोसले, अमोल मगर, सागर कोंडेकर, नेताजी बुवा, फिरोज चाऊस, सतीश कराळे,शार्दुल पाटील, वनमित्र संस्था,शिवराज्य मंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना, हरितवारी ग्रुप, संभाजी ब्रिगेड कागल, अनिस शाखा कागलचे सर्व सदस्य उपस्थित होते. रत्नागिरी किल्ले रत्नदुर्ग येथे वनमित्र संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम प्रसंगी गोळा केलेला कचरा.