उत्सव नवदुर्गांचा – सन्मान स्त्री शक्तीचा पुष्प – 2

         शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने निर्मिती शक्तीचा सन्मान! पृथ्वीच्या सर्जनशील शक्तीला वंदन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या नवरात्रोत्सवात, आपल्या कार्यकर्तृत्वाने कुटुंब आणि गावविकासाला हातभार लावणाऱ्या नवदुर्गा अर्थात प्रेरणादायी महिलांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

Advertisements

            पन्हाळा तालुक्यातील येवलूज येथील पूर्वाश्रमीच्या गितांजली पाटील यांनी लौकीक अर्थाने आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण येवलूज येथे पूर्ण केले. 10 वी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे 2 वर्षानंतर लग्न झाले आणि गितांजली तोरसकर नावाने करवीर तालुक्यातील कुडित्रे गावच्या सुनबाई झाल्या. एकत्र कुटुंब पद्धती. कुटुंबात साधारणता 15 सदस्य. सासरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच.

Advertisements

मूळच्या अभ्यासात हुशार असणाऱ्या श्रीमती गीतांजली यांनी हार न मानता आपल्यासह संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्याचा निर्णय घेतला. मात्र हे करत असताना त्यांना आर्थिक अडचणीचा जागोजागी सामना करावा लागला. अशावेळी त्यांच्या मदतीला मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी कार्यरत असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ धावून आले.

Advertisements

त्यांनी तोरसकर कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांची कर्ज प्रकरणाची फाईल बनवली व ती शाहूपुरी येथील यशवंत सहकारी बँकेत सादर केली. त्या बँकेने त्यांच्या कार्यक्षमतेवर व जिद्दीवर विश्वास दाखवत पाच वर्षासाठी तब्बल 12 लाख रुपयांचे कर्ज तोरसकर कुटुंबियांना दिले.

या कर्जातून त्यांनी जय हनुमान डेअरी फार्म उघडला. सध्या या डेअरी फार्म अंतर्गत त्यांच्याकडे तब्बल 25 छोट्या – मोठ्या दुधाळ गाई असून या गाईंद्वारे सकाळ – संध्याकाळ असे दीडशे लिटर दुधाचे संकलन होते. दुधाच्या गुणवत्तेनुसार 35 ते 36 रुपये असा प्रति लिटर दर दुधाला मिळतो आहे. केवळ डेअरी फार्मवरच न थांबता तोरस्कर कुटुंबियांनी गांडूळ खत तसेच कुकुटपालन असा कृषीपूरक व्यवसायही केला. त्यामुळे या कुटुंबात आर्थिक स्थैर्य तर आलेच पण त्यांच्या जगण्याचा स्तरही उंचावला.

  • Best Gift For Kanjak /navratri gift/kanya poojan
  • Best Quality plats
  • Stainless Steel pavbhaji thali

पाहता पाहता या कुटुंबाने प्रति महिना 28 हजार रुपये याप्रमाणे आजपर्यंत साधारणता पाच लाख रुपयांपर्यंत कर्जाची परतफेडही केली. या डेअरी फार्मच्या उत्कर्षासाठी कुटुंबातील सर्व सदस्य आळीपाळीने एकत्र येत मेहनत घेतात.

       श्रीमती गितांजली तोरसकर यांचे कार्यकर्तृत्व आणि समर्पण हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. शारदीय नवरात्र हा उत्सव केवळ भक्तीचा नाही, तर स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. श्रीमती तोरसकर यांच्यासारख्या नवदुर्गा आपल्या समाजाला समृद्ध आणि सक्षम बनवत आहेत. भविष्यात स्वतःचाच ब्रँड निर्माण करण्याचे स्वप्न त्यांचे चिरंजीव अनिकेत तोरसकर बोलून दाखवतात. अशा वेळेला त्यांच्या डोळ्यात दिसते ती त्यांच्या स्वप्नांची जिद्द ! दुर्दम्य आशवाद !! या आशावादला आणि जिद्दीला मनःपूर्वक शुभेच्छा !!

 फारूक बागवान

माहिती अधिकारी

9881400405

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!