शारदीय नवरात्र हा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने निर्मिती शक्तीचा सन्मान! पृथ्वीच्या सर्जनशील शक्तीला वंदन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. या नवरात्रोत्सवात, आपल्या कार्यकर्तृत्वाने कुटुंब आणि गावविकासाला हातभार लावणाऱ्या नवदुर्गा अर्थात प्रेरणादायी महिलांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ (कळे) येथील दुर्गामाता बचत गट ही श्रीमती सविता शामराव सुतार यांच्या दृष्टीकोन आणि मेहनतीचे फळ आहे. 2010 मध्ये दहा महिलांनी एकत्र येत या बचत गटाची स्थापना केली. आज हा गट विविध उत्पादनांद्वारे नावलौकिक मिळवत आहे. लोणचे, पापड, चटण्या, नाचणी, पशुपालन, सुतारकाम, शिवणकाम, पालक-टोमॅटोवरील प्रक्रिया, मॅंगो चॉकलेट आणि पायनापल शेवया अशी वैविध्यपूर्ण उत्पादने या गटामार्फत तयार होतात. ही उत्पादने मुंबई, गोवा, पुणे, कोल्हापूर आणि राज्यातील इतर ठिकाणी होलसेल दुकानांमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात.

सुरुवातीला श्रीमती सुतार यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वित्तीय संस्थांनी कर्ज देण्यास नकार दिला. पण त्यांनी हार मानली नाही. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि अस्मिता लोकसंचित साधन केंद्र, बालिंगा यांच्या सहकार्याने त्यांनी बँक ऑफ बडोदा – कोपर्डे शाखेतून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत 5 लाख रुपयांचे कर्ज मिळवले, ज्यामध्ये 35% अनुदानाचा समावेश होता. यातूनच त्यांच्या आर्थिक समृद्धीचा प्रवास सुरू झाला. या बचत गटाने प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करत बँकेचे कर्ज फेडले. इतकेच नव्हे, तर 5 लाख रुपयांची अद्ययावत यंत्रसामग्री आणि दोन गुंठ्याची जागाही खरेदी केली. आज या बचत गटाचा वार्षिक टर्नओव्हर तब्बल 30 लाख रुपये आहे. भविष्यात हा आकडा आणखी वाढवण्याचा निर्धार श्रीमती सुतार यांनी व्यक्त केला आहे.

श्रीमती सुतार यांनी केवळ उत्साहाने नव्हे, तर नियोजनबद्ध मेहनतीने यश मिळवले. त्यांनी बचत गट संकल्पना प्रशिक्षण, लेखा आणि आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, उद्योजकता जाणीव जागृती प्रशिक्षण (EAP) आणि उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) यांचे रीतसर प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणांनी त्यांच्या बचत गटाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मजबूत पाया दिला.

श्रीमती सुतार यांनी केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले नाही, तर इतरांना सक्षम बनवण्याचाही विचार केला. त्यांच्या बचत गटाने सात जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 2023 मध्ये श्रीमती सुतार आणि त्यांच्या बचत गटाला यशस्वी उद्योजिका आणि बचत गट म्हणून सन्मानित केले. हा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा गौरव आहे.

श्रीमती सविता सुतार आणि त्यांच्या दुर्गामाता बचत गटाची ही कहाणी नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत साजरी होणाऱ्या नवदुर्गाच्या तेजस्वी रूपाची आठवण करून देते. त्यांचे कार्यकर्तृत्व आणि समर्पण हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. शारदीय नवरात्र हा उत्सव केवळ भक्तीचा नाही, तर स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. श्रीमती सुतार यांच्यासारख्या नवदुर्गा आपल्या समाजाला समृद्ध आणि सक्षम बनवत आहेत.
फारूक बागवान
माहिती अधिकारी
9881400405
जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापू