पिंपळगाव खुर्द (प्रकाश पाटील) : भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने त्यांना मिळालेला मतदानाचा पवित्र हक्क १०० टक्के बजावावा असे आवाहन कागल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे यांनी केले.
व्हन्नूर (ता.कागल) येथे स्वीप मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत कागल तहसील व पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या सायकल रॅली, गीत गायन कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. सशक्त लोकशाही हवी असेल तर मतदानाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एक सजग नागरिक म्हणून मतदान करणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
यावेळी श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व विद्या मंदिर या शाळेच्या मुला-मुलींनी गावातून काढलेल्या सायकल रॅलीत सहभाग घेतला. लोकशाहीर राजू भोरे व सहकारी यांनी मतदार जनजागृतीपर गीत गायन केले. यावेळी दुकानदार , ग्रामस्थ यांना गटशिक्षणाधिकारी सौ.कासोटे यांनी समक्ष भेटून मतदान करण्याचे आवाहनही केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे, मुख्याध्यापक व्ही.जी. पोवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय दाभाडे, प्राथमिक माध्यमिक शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा सहभाग होता. स्वागत बाळासाहेब सासमिले यांनी केले. आभार सौ.जयश्री वैराट यांनी मानले.