मुरगूडमध्ये जोतिबा फुले स्मृतिदिन
मुरगूड (शशी दरेकर) : राजर्षी शाहूंना शूद्र म्हणून हीनवणारी,ज्योतिबा फुले यांच्यावर हल्ला करणारी,सावित्रीबाईंच्या अंगावर शेणाचा मारा करणारी प्रवृत्तीच अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हाती घेणाऱ्या गांधीजींवर हल्ला करते, तिच मानसिकता व प्रेरणा दाभोळकर,पानसरे,गौरी लंकेश यांच्या हत्येमागे असते.
यातून प्रतिक्रांतीचा प्रवाह आजही समाजात जगवला जातो हेच दिसून येते. जोपर्यंत द्वेषाचे राजकारण करण्याची सवय समाजातून जाणार नाही व लोकोत्तर व्यक्तीचे विचार सोईनुसार वापरण्याची सवय संपणार नाही तो पर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांची समतेची व्यवस्था नांदू शकणार नाही असे प्रतिपादन दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी केले.
समाजवादी प्रबोधिनी मुरगुड शाखेच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक पी व्ही पाटील होते यावेळी गजाननराव गंगापुरे, पी.डी. मगदूम प्रमुख उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात व्याख्यान संपन्न झाले.
वसंत भोसले म्हणाले “जाती-धर्माचे राजकारण करणारे ‘राज्यघटना बदलायला निघालेत’ असे रडगाणे
आदळआपट करणे म्हणजे स्वतःची व समाजाची फसवणूक करण्यासारखे आहे. घटना न बदलताही देशातील सर्व समाज घटकांसाठी समान शिक्षण,आरोग्य,जगण्याची संधी नाकारणारे धोरण स्वीकारून घटनेचा आत्मा नष्ट करण्यात आला आहे. फुले, शाहू,आंबेडकर यांच्या विचारातून समता व सर्वसमावेशक राज्य प्रशासनाचे
धडे गिरवणारे यशवंतराव चव्हाण यांचे विचार मराठा राज्यकर्त्यांनी स्वीकारले घेतले असते तर मराठा समाजास मोर्चे काढावे लागले नसते.
आपल्या दीड तासाच्या व्याख्यानात महात्मा ज्योतिबा फुले कसे घडले हे सांगताना तत्कालीन सामाजिक स्थिती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना त्यांना आलेले अनुभव याचे शब्दचित्र त्यांनी श्रोत्यांसमोर उभे केले. महामानव कसे घडले हे सांगताना अनेक महामानवांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे संदर्भ दिले.
महात्मा फुले मांडत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,डॉक्टर आंबेडकर, केशवराव जेधे,त्यांना सहकार्य करणारे सर्व जातीचे लोक, महिलांची भारतातील व चीनमधील स्थिती, भारतीय समाजात वाढणारी स्त्रियांना जनावरांसारखी वागणूक देणारी व बलात्काराची मानसिकता यावर आपली मते मुक्त व परखडपणे व्यक्त केली.
स्वागत कॉम्रेड बबन बारदेस्कर प्रास्ताविक बी एस खामकर सूत्रसंचालन समीर कटके तर आभार जयवंत हावळ यांनी मानले.
व्याख्यानास दैनिक लोकमतचे उपसंपादक संतोष मोरबाळे, प्रतिनिधी अनिल पाटील, दत्ता लोकरे, दत्तामामा खराडे, आर. डी. चौगुले, आर. पी. पाटील, जी. पी. शिरसेकर, बापूसाहेब गुजर, पी आर पाटील, दि. रा. चव्हाण, प्रकाश भोसले, आनंदराव कल्याणकर, पांडुरंग चांदेकर, भीमराव कांबळे, सदाशिव यादव, सिकंदर जमादार उपस्थित होते.