मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथे प्रबोधन चळवळीतील ज्येष्ठ व्यासंगी कार्यकर्ते दलितमित्र डी. डी. चौगले यांचा अमृत महोत्सव वाढदिवस सर्वपक्षीय गौरव समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, डॉ भारत पाटणकर धनाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील हे होते.
डी.डी चौगुले यांचा अमृत महोत्सवा निमीत्य नागरी सत्कार संपन्न
यावेळी बोलतांना खासदार प्रा. संजयदादा मंडलिक म्हणाले, ” भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आणि देशभक्तीचे संस्कार लाभल्यामुळे पन्नास वर्षाहून अधिक काळ डी. डी. चौगुले प्रबोधनाचा वसा समर्थपणे सांभाळत आले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील व्यासंगी प्रबोधकारांना मुरगूडमध्ये निमंत्रित करून येथील तरुण पिढ्यांचे प्रबोधित करण्याचे कार्य ज्या चिकाटीने चालवले त्याला तोड नाही. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, प्रतिगामी विचाराच्या पक्ष संघटनांनी अंधश्रद्धा, द्वेष आणि परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण केल्यामुळे देश विचित्र अवस्थेतून जात आहे. अशा जिकिरीच्या परिस्थितीत प्रबोधनाची ताकद क्षीण होऊ नये यासाठी आपल्या पंचाहत्तरीतही झटणारे दलितमित्र डी. डी. चौगले सर पुरोगामी विचाराच्या पक्ष संघटनांसाठी आदर्श मार्गदर्शक ठरतात. आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, ” दलितमित्र डी. डी. चौगले यांचे कार्य व जीवन पाहिल्यास प्रबोधनाची चळवळ माणसाच्या मनावर विद्वत्ता, अभ्यास व शिस्तीचा महत्त्वाचा संस्कार देते, याचीच प्रचिती येते. हाच संस्कार पुढील पिढ्यांना देण्याचे कार्य त्यांनी असेच सुरू ठेवावे. या प्रसंगी आमदार श्री. हसनसो मुश्रीफ व खासदार श्री. संजय मंडलिक यांच्या हस्ते डी डी चौगुले यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. तर प्रसाद कुलकर्णी व डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या हस्ते श्री चौगुले यांची ग्रंथतुला करण्यात आली.
सत्कारास उत्तर देताना दलितमित्र श्री. चौगुले म्हणाले, “कितीही अडचणी आल्या तरी प्रबोधनाचे हे कार्य मुरगुडमध्ये असेच अविरतपणे चालू राहील, त्यासाठी मी कटीबद्ध आहे. कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एन. डी. पाटील, स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पुरोगामी विचारांचे नाते अखेरपर्यंत सोडणार नाही, असेही ते म्हणाले”. डॉ. प्रकाश शहापूरकर, कॉ.धनाजी गुरव, डॉ. टी. एस पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, प्रसाद कुलकर्णी, डॉ. महावीर माने यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. स्वागत शिवाजीराव चौगले यांनी, प्रास्ताविक समीर कटके यांनी तर आभार दिगंबर परीट यांनी मानले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर,माजी आमदार के.पी.पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक ए. वाय.पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने,दलितमित्र व्यंकाप्पा भोसले,व्ही. डी.माने, हसन देसाई,सुंदरराव देसाई,डॉ. जयंत कळके,डॉ.अर्जुन कुंभार, माजी नगरसेवक किरण गवाणकर ,संघसेन जगतकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते,पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते व चौगले यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.