देशामध्ये जातीयवादी आणि धर्मांध विचारधारा पसरवून भारतीयांची डोकी भडकविण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत.यामध्ये संपूर्ण भारतीय समाज पुन्हा एकदा पारतंत्र्यात जाण्याची भीती निर्माण होत आहे अशा परिस्थितीमध्ये भगतसिंगांसारख्या क्रांतीकारकांचे विचारच भारतीयांना तारतील असं प्रतिपादन दलितमित्र डी.डी.चौगले यांनी केले.ते समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड येथे शहिद दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात बोलत होते.
मुरगुड ता.कागल येथे समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड यांच्या वतीने भगतसिंग, राजगुरू व सुखदेव स्मृतीदिन चर्चासत्र आयोजित केले होते.23 मार्च 1931 रोजी या तीन क्रांतीकारकांना लाहोर जेल या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली.हा दिवस संपुर्ण भारतभर ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो.यानिमित्त मुरगुड मध्येही हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलितमित्र डी.डी चौगले सर होते.स्वागत समाजवादी प्रबोधनी शाखा मुरगुडचे अध्यक्ष बबन बारदेस्कर यांनी केले तर प्रास्ताविक सचिव समिर कटके यांनी केले.
एका बाजूला स्वातंत्र्य चळवळीतील संघटना,आंदोलने आणि क्रांतीकारकांचे योगदान समाजमनाच्या विस्मृतीत घालविण्याचा संघटीत प्रयत्न सुरू आहे तर दुसर्या बाजूला परिवर्तनवादी विचारधारा क्षीण होताना दिसत आहेत याची खंत तर आहेच पण भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षेतेसाठी,आर्थिक आणि सामाजिक समतेसाठी संघटना,आंदोलने मजबुत करण्याची गरज आहे अशा भावना उपस्थितांनी या चर्चासत्रात व्यक्त केल्या.यावेळी महाराष्ट्र अंनिस शाखा मुरगुडचे अध्यक्ष भिमराव कांबळे यांनी उपस्थितांना शहिद भगतसिंग हे पुस्तक भेट देवून भगतसिंगांनी जोपासलेली वाचन संस्कृती वाढविण्याचा कृतीशील संदेश दिला.
यावेळी बी.एस.खामकर,शाहू फर्नांडिस, शंकर कांबळे, भीमराव कांबळे, प्रदीप वर्णे, विलास भारमल, विश्वनाथ शिंदे, एन.बी.कांबळे, सचिन सुतार, जयवंत हावळ आदींनी चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक वारसदार संघटना, समाजवादी प्रबोधिनी, महाराष्ट्र अंनिस व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.विकास सावंत यांनी आभार मानले.